राहुल द्रविडची टी-20 विश्वचषक शेवटची स्पर्धा

राहुल द्रविडची टी-20 विश्वचषक शेवटची स्पर्धा

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सध्या अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरु असलेली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही भारतीय संघाचा विद्यमान प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडची शेवटची राहिल. या स्पर्धेनंतर द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहणार नाही.
राहुल द्रविडने 2021 च्या नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. संघातील खेळाडूंच्या सहकार्यामुळे मी प्रशिक्षकपदाचा आनंद पुरेपूर उपभोगू शकलो, अशी प्रतिक्रिया द्रविडने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. संघाचा प्रत्येक सामना माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याने मी खेळाडूंना त्यानुसार मार्गदर्शन केले. 2021 ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागविले आहेत. लवकरच भारतीय क्रिकेट मंडळाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतरच नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल. माझ्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीतील शेवटच्या टप्प्यात आयसीसीची ही स्पर्धा भारतीय संघाला जिंकून देण्यासाठी माझे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील, असेही द्रविडने आपले मनोगत व्यक्त केले.