भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व शक्य

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व शक्य

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत या परिषदेत आणखी सदस्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. भारताने पुरेसा दबाव आणल्यास भारताचा हे महत्वाचे स्थान मिळू शकते, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रशिया-युक्रेन युद्ध असो, किंवा गाझापट्टीतला संघर्ष असो, संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका तळ्याता-मळ्यात अशीच राहिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ कमजोर झाला आहे, अशी भावना जगात वाढीला लागली असून भविष्यकालीन परिणामांच्या दृष्टीने अशी स्थिती असणे योग्य नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि सुरक्षा परिषद यांच्या मूळ रचनांमध्येच परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. सध्या या संदर्भात बरीच चर्चा आणि खल होत आहे. प्रत्येक देश आपली भूमिका बोलून दाखवित असून, अनेक सूत्रे पुढे येत आहेत. मेक्सिको मॉडेल, लिचटेन्स्टेन मॉडेल इत्यादींवर चर्चा केली जात आहे. भारत, जपान, जर्मनी आणि ब्राझील यांनी एक संयुक्त भूमिका मांडली आहे. या सर्व विचारमंथनातून जे निष्पन्न होईल, ते भारताच्या दृष्टीने योग्यच असेल, अशी भूमिका त्यांनी विशद केली आहे.