निशांत देवने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित

निशांत देवने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित

पुरुष गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिलाच बॉक्सर
वृत्तसंस्था/ बँकॉक
जागतिक बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून निशांत देवने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे. निशांतने 71 किलो गटात मोल्दोव्हाच्या वासिल सेबोटारीचा एकतर्फी पराभव करत ही कामगिरी साकारली. विशेष म्हणजे, निशांतपूर्वी, महिला बॉक्सर निखत जरीन (50 किलो), प्रीत पवार (54 किलो) आणि लोव्हलिना बोरगोहेन (75 किलो) यांनी कोटा मिळवला आहे.
बँकॉकमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी 71 किलो गटात उपांत्यपूर्व सामना झाला. या सामन्यात निशांतने सुरुवातीपासून आक्रमक खेळताना सेबोटरीला 5-0 असा दणका दिला. निशांतने या लढतीत प्रतिस्पर्धी सेबोटरीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही, हे विशेष.
महिलांच्या 60 किलो गटात अंकुशिता बोरोला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तिला स्वीडनच्या एग्नेसने 3-2 असे पराभूत केले. अंकुशिताच्या पराभवाने भारताच्या 60 किलो गटात ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात चार भारतीय बॉक्सर मैदानात उतरतील. अरुंधती चौधरी (66 किलो), अमित पंघल (51 किलो), सचिन सिवाच (57 किलो) आणि संजीत (92 किलो)  पॅरिस ऑलिम्पिक स्पॉटपासून फक्त दोन विजय दूर आहेत.