भारत-बांगलादेश सराव सामना आज

भारत-बांगलादेश सराव सामना आज

खेळपट्टी व वेगवान गोलंदाजांना आजमावून पाहण्याची संधी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 1 जूनपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा एकमेव सराव सामना बांगलादेश बरोबर येथे शनिवारी खेळविला जात आहे. अमेरिकेतील नव्या खेळपट्ट्यांवर भारताच्या वेगवान गोलंदाजांची सत्वपरीक्षा राहिल. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना दर्जेदार कामगिरीसाठी अधिक झगडावे लागेल. त्याचप्रमाणे सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या फलंदाजीच्या फॉर्मबद्दल चाचणी घेईल. या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी आयर्लंडबरोबर होत आहे.
नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विविध संघांच्या फ्रांचाइजीकडून निवडण्यात आलेल्या 15 पैकी अंतिम 11 खेळाडूंसाठी चाचपणी केली जात होती. आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघ व्यवस्थापनाला अंतिम 11 खेळाडूंची योग्य निवड करण्यासाठी कसरत करावी लागेल. भारतीय संघ यावेळी आयसीसीची ही स्पर्धा जिंकून तब्बल गेल्या 13 वर्षातील जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि लवकरच आपल्या प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त होणारा अनुभवी प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजांची निवड करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल. कर्णधार शर्मा समवेत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालचा विचार निश्चितच होईल. मात्र जैस्वालला तंदुरुस्त कसे ठेवता येईल, ही एक समस्या आहे. तसे झाल्यास शिवम दुबेला अंतिम 11 खेळाडूत स्थान मिळणे शक्य नाही. भारतीय संघातील शिवम दुबे हा फलंदाज षटकार खेचणारे यंत्र म्हणून ओळखले जाते. दुबेला अंतिम 11 खेळाडूत संधी मिळाली तर मात्र यशस्वी जैस्वालला सलामीला खेळविण्याची शक्यता कमी राहिल. भारतीय संघामध्ये नवोदीत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग तसेच मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीची अमेरिकेतील या नव्या खेळपट्ट्यांवर सत्वपरीक्षा राहिल. बुमराहला नव्या चेंडूवर दुसरा साथिदार निवडताना अर्शदीप किंवा सिराज यापैकी एकाची निवड केली जाईल. अष्टपैलू हार्दिक पांड्याची 4 षटके सामन्यात महत्त्वाची ठरतील. अमेरिकेतल्या या नव्या खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाजांनी बऱ्यापैकी सराव केला असून अर्शदीप आणि सिराज यांची तुलना केल्यास अर्शदीप या खेळपट्ट्यांवर अधिक प्रभावी राहिल, असा अंदाज आहे. बांगलादेश संघातील शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज त्याचप्रमाणे मुस्ताफिजूर रेहमान यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघातील मध्य फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल. शनिवारचा हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7.30 वा. सुरु होईल.