सिंगापूर ओपन बॅडमिंटनमध्ये त्रीसा-गायत्री सेमीफायनलमध्ये

सिंगापूर ओपन बॅडमिंटनमध्ये त्रीसा-गायत्री सेमीफायनलमध्ये

वृत्तसंस्था/ बँकॉक
गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली या भारतीय जोडीने विजयी धडाका कायम ठेवत सिंगापूर ओपन स्पर्धेच्या महिला दुहेरीत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या किम येओंग आणि कोंग यंग जोडीचा 21-18, 21-19, 24-22 असा पराभव केला. उपांत्य फेरीत जपानच्या नामी मात्सुयामा व चिहारु शेडा या जोडीविरुद्ध गायत्री-त्रिशाचा सामना होईल.
गायत्री आणि त्रीसा यांच्यातील महिला दुहेरीतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच चुरशीचा झाला. 79 मिनिटे चाललेल्या या लढतीत उभय खेळाडूंत एकेका गुणासाठी संघर्ष पहायला मिळाला. कोरियन जोडीने पहिला गेम जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र गायत्री व त्रीसा यांनी दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत हा गेम 21-19 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसरा व निर्णायक गेम चांगलाच चुरशीचा झाला. एकवेळ दोन्ही खेळाडूत 20-20, 22-22 अशी आघाडी होती, पण मोक्याच्या क्षणी भारतीय जोडीने सलग दोन गुणाची कमाई करत हा गेम 24-22 असा जिंकला व उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
दरम्यान, सिंगापूर ओपनमध्ये पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, सात्विक-चिराग यांचा पराभव झाल्याने भारताच्या आशा फक्त गायत्री व त्रीसा यांच्यावर असणार आहेत. स्पर्धेत आतापर्यंत सुरेख कामगिरी केलेल्या भारतीय जोडीकडून आता उपांत्य फेरीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.