नीरज चोप्रा, किशोर जेना यांना अंतिम फेरीत थेट प्रवेश

नीरज चोप्रा, किशोर जेना यांना अंतिम फेरीत थेट प्रवेश

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे 15 मे रोजी होणाऱ्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे अव्वल भालाफेकधारक अॅथलिट्स नीरज चोप्रा आणि किशोर जेना यांना थेट अंतिम फेरीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही अॅथलिट्सनी त्यांच्या वैयक्तिक अॅथलेटिक्स कारकिर्दीत विविध स्पर्धांमध्ये अनेक वेळा 75 मी. पात्रतेची मर्यादा पार केली असल्याने ते आता या स्पर्धेत थेट अंतिम फेरीत उतरतील.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तसेच विश्व चॅम्पियन नीरज चोप्राला गेल्या आठवड्यात झालेल्या डायमंड लीग सिरीज अॅथलेटिक्स स्पर्धेतील दोहाच्या पहिल्या टप्प्यात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नीरजने या स्पर्धेत 88.38 मी. भालाफेक नोंद करत रौप्यपदक पटकाविले. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात रौप्यपदक मिळविणाऱ्या किशोर जेनाला डायमंड लीग सिरीज अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदार्पणात पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करता आली नाही. तीन फेऱ्यांनंतर त्याने 76.31 मी. भालाफेक नोंद केल्याने त्याला अंतिम फेरीपासून वंचित व्हावे लागले. भारताचा आणखी एक भालाफेकधारक अॅथलिट डी. पी. मनू याने 2023 च्या विश्व चॅम्पियनशिप अॅथलेटिक्स स्पर्धेत सहावे स्थान मिळविताना 85.50 मी. ऑलिम्पिक पात्र फेरी मर्यादा ओलांडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंगळवारी तो फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत थेट अंतिम फेरीत उतरणार आहे.