ओडीशा मुख्यमंत्रीपदासाठी मोहन माझी

ओडीशा मुख्यमंत्रीपदासाठी मोहन माझी

नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत एकमुखाने प्रस्ताव संमत, शपथविधी आज
वृत्तसंस्था / भुवनेश्वर  
ओडीशाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार मोहन चरण माझी यांची निवड करण्यात आली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना साहाय्य करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती होणार आहे. या राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मोहन माझी यांच्या नावाच्या प्रस्तावाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदांसाठी के. व्ही. सिंगदेव आणि प्रवाती परीदा यांच्या नावांनाही संमती देण्यात आली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केंद्रीय निरीक्षकाची भूमिका यावेळी पार पाडली.
शपथविधी कार्यक्रम आज बुधवारीच होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ओडीशा राज्यातील हे भारतीय जनता पक्षाचे स्वबळावरचे प्रथमच सरकार आहे.
विधानसभा निवडणुकीत विजय
ओडीशामध्ये लोकसभा निवडणुकीसमवेतच विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. या पक्षाने विधानसभेच्या एकंदर 147 जागांपैकी 78 जागांवर विजय प्राप्त केला आहे. लोकसभेच्याही 21 पैकी 20 जागा या पक्षाने पटकाविल्या आहेत. यापूर्वी बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक यांच्या हाती या राज्याची सत्ता सलग 24 वर्षे राहिलेली होती. मात्र, पटनाईक सलग पाचवी विधानसभा निवडणूक त्यांच्या पक्ष त्यांच्या नेतृत्वात जिंकू शकला नाही. यावेळी बिजू जनता दलाचा अनपेक्षितरित्या पराभव झाला. या पक्षाला 51 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. यापूर्वी दोन वेळा या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांचे संयुक्त सरकारही राहिलेले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी चार नावे चर्चेत
मुख्यमंत्रीपदासाठी प्रामुख्याने चार नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यांच्यात एक नाव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही होते. तसेच अनुभवी आणि ज्येष्ठ नेते जुआल ओराम यांचेही नाव घेतले जात होते. तथापि, या दोन्ही नेत्यांची केंद्रीय मंत्रीपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी झाला नाही. अखेर मोहन माझी यांची या पदावर नियुक्त निश्चित झाली आहे.
माझी चारवेळचे आमदार
मोहन माझी हे भारतीय जनता पक्षाचे ओडीशातील प्रबळ आदिवासी नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते केओंझार मतदारसंघातून 11 सहस्र 577 मतांनी विजयी झाले आहेत. कुशल संघटक म्हणून ते परिचित असून त्यांचे वय 52 वर्षांचे आहे. ते तरुण वयापासून भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून ओडीशाच्या आदिवासी पट्ट्यात पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट गेली 30 वर्षे घेतलेले आहेत. त्यांचा जनाधार मोठा असल्याचे तज्ञांचे मत आहे.