कुंभच्या तयारीसाठी 2500 कोटीचा निधी

कुंभच्या तयारीसाठी 2500 कोटीचा निधी

योगी सरकारने घेतला निर्णय : नव्या बदली धोरणाला मंजुरी
वृत्तसंस्था/ लखनौ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तरप्रदेश मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली आहे. या बैठकीत बदली धोरण 2024-25 ला मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण 41 प्रस्ताव मांडण्यात आले होते. तर 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 2500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत बुंदेलखंड क्षेत्राच्या 50 पैकी 26 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांकरता एकूण 10,858 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दोन महिन्यात सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येतील अशी माहिती बैठकीनंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी दिली आहे.
खासगी विद्यापीठांना चालना देण्याचा आणि प्रत्येक तालुक्यात एक शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच मुरादाबाद विद्यापीठाला गुरु जंभेश्वर यांचे नाव दिले जाणार आहे. तर बरेलीमध्ये हरित गाजियाबाद आणि फ्यूचर युनिव्हर्सिटी सुरू केली जाणार आहे.
प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभच्या तयारीकरता 2025 मध्ये 4000 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तर 2019 मध्ये याचा आकार 3200 हेक्टर इतका होता. मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात सुमारे 6 कोटी लोक पोहोचतील असा अनुमान आहे. याचमुळे कुंभमेळ्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नोएडामध्ये 500 बेड्सच्या रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली असून याची निर्मिती 15 एकर भूखंडावर केली जाणार आहे. आयआयटी कानपूरमध्ये वैद्यकीय संशोधनासाठी स्कुल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाणार आहे. याकरता राज्य सरकार दरवर्षी 10 कोटी रुपयाचा निधी देणार आहे. अशाप्रकारे 5 वर्षांत 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित आर्थिक सहाय्य केंद्र सरकारकडून केले जाईल.