खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी केजरीवालांच्या पीएचे गैरवर्तन?

खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी केजरीवालांच्या पीएचे गैरवर्तन?

दिल्लीच्या सीएम हाऊसमध्ये मारहाण केल्याचा आरोप : तक्रारीसाठी पोलिसांना फोनकॉल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोमवारी केला. मालीवाल यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात यासंबंधी दूरध्वनीवरून तक्रार केल्याचे समजते. कथित बाचाबाचीनंतर मालीवाल यांनी पीसीआरला कॉल केल्यानंतर सकाळी 10 वाजता सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यासंबंधी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान किंवा दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आप खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली होती. स्वाती मालीवाल सकाळी 9.10 वाजता सीएम हाऊसमध्ये पोहोचल्या. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या पीएने त्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. ही घटना सीएम हाऊसमध्ये घडली, परंतु अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा दावा भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी केला. त्यानंतर डीसीपी मनोज मीना यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देताना सकाळी 9:34 वाजता सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेचा कॉल आला होता. या महिलेने सीएम हाऊसमध्ये आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार केली. काही वेळाने खासदार स्वाती मालीवाल पोलीस ठाण्यात पोहोचल्या, मात्र त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर अहवाल दाखल करणार असल्याचे तिने सांगितले.
भाजपने साधला निशाणा
या प्रकरणाबाबत भाजप नेत्या बासुरी स्वराज म्हणाल्या की, ‘अरविंद केजरीवाल यांच्या ओएसडीने त्यांच्या पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करत गैरवर्तन केले आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांनाही फोन केला. केजरीवाल यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. भाजप या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते. भाजप याबाबत कठोर भूमिका घेईल. ही लाजिरवाणी बाब असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्तर द्यावे लागेल. केजरीवाल यांच्यासमोरच पक्षाच्या महिला खासदार सुरक्षित नसतील तर ते दिल्लीतील महिलांचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न स्वराज यांनी केला.