मनिका बात्राची मानांकनात झेप

मनिका बात्राची मानांकनात झेप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने विश्व मानांकन टेबल टेनिस मानांकनात 24 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अलिकडे झालेल्या सौदी स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेतील तिने दर्जेदार कामगिरी केल्याने महिला टेबल टेनिसपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या 25 खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याचा पराक्रम केला आहे. भारतातर्फे असा पराक्रम करणारी मनिका ही पहिली टेबल टेनिसपटू आहे.
28 वर्षीय मनिका बात्राला यापूर्वी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सौदीमधील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मनिका महिला टेबल टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 39 व्या स्थानावर होती. पण जेदातील या स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्याने तिच्या मानांकनात लक्षणीय सुधारणा झाली. तिचे मानांकन 15 अंकांनी वधारले. मनिकाने 350 मानांकन गुण मिळविले असून आता तिचे लक्ष येत्या जुलैमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेवर राहिल. गेल्या वर्षी हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती भारताची पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरली. बात्राला अमन बालगु आणि बेलारुसची तिची सहकारी किरील बेराबेनोव्ह यांचे आभार मानावे लागतील. 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिका बात्राने वैयक्तिक गटात तसेच सांघिक प्रकारात सुवर्णपदके मिळविली आहेत. तसेच तिने सौदी स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत चीनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि अनेक वेळेला विश्व चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या वेंग मेनयुला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता.