खरीप हंगामासाठी भात बियाणे उपलब्ध

खरीप हंगामासाठी भात बियाणे उपलब्ध

आजपासून विक्रीस सुरुवात : बियाणांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
खानापूर : खरीप हंगामासाठी विविध जातीची भात बियाणे रयत संपर्क केंद्रातून शुक्रवारपासून विक्री केली जाणार आहेत. विक्रेत्यांनी जादा दराने खत विक्री केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी भात बियाणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कृषी खात्याकडून विविध जातीची भात बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. अभिलाषा, आयआर 64, बीपीटी, जया ही भात बियाणे उपलब्ध असून, ही भात बियाणे सबसिडीच्या दराने देण्यात येणार आहेत. यात सामान्य वर्गाला 8 रुपये तर मागास व इतर मागासाना 12 रुपये किलोमागे सबसिडी देण्यात येणार आहेत. या बियाणांची विक्री बिडी, गुंजी, जांबोटी, खानापूर या रयत संपर्क केंद्रात करण्यात येणार आहे. तर कक्केरी आणि हिरेमुन्नोळी येथील पिकेपीएस सोसायटीतून करण्यात येणार आहे. यावर्षी खरिपात अंदाजे 32 हजार हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाण्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच 19 हजार हेक्टर जमिनीवर ऊसपीक घेण्यात येत असून, इतर 6 हजार हेक्टरमध्ये इतर पिके घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प़ृषी खात्याकडून सर्व तयारी झाली असून शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना पुरवण्यासाठी कृषी खात्याचे कर्मचारी कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांवर सक्ती केल्यास कठोर कारवाई
खरिपाच्या हंगामासाठी तालुक्यातील खत विक्रेत्यांची कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी बैठक घेऊन जादा दराने खत विक्री केल्यास अथवा शेतकऱ्यांना कोणत्याही बी बियाणे आणि खतासाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला. तसेच कोणत्याही खताचा काळाबाजार होऊ नये, यासाठी रोजच्या रोज फलकावर उपलब्ध खतांची आणि विक्री केल्यांची माहिती नोंद करण्यात यावी, अशी सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. तसेच खत विक्री दारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास कृषी खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.