मॅग्नस कार्लसन जेता, प्रज्ञानंदला चौथे स्थान

मॅग्नस कार्लसन जेता, प्रज्ञानंदला चौथे स्थान

वृत्तसंस्था/ वॉर्सा
सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने स्वत:ला त्याच्या समवयस्कांपेक्षा सरस सिद्ध केले असून त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे, तर मॅग्नस कार्लसनने अंतिम दिवशी 9 पैकी 8 गुणांची कमाई अशी दमदार कामगिरी करून अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केला.
ब्लिट्झच्या नऊ फेऱ्या शिल्लक असताना आणि शेवटच्या दिवशी 2.5 गुणांची मोठी आघाडी पदरी असताना चीनच्या वेई यीला शेवटच्या नऊ लढतींमध्ये 5 पेक्षा कमी गुण कमावता आल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कार्लसनने स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात यीला निसटत्या फरकाने मागे टाकत स्पर्धा जिंकली. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू या स्पर्धेतील नऊ लढती आणि त्यानंतर अन्य एका स्पर्धेतील ऑनलाईन चार लढती खेळल्याने थकल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
तथापि, जेव्हा अडचणीची परिस्थिती येते तेव्हा आपल्याला सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून का गणले जाते ते कार्लसन दाखवून देतो. एकापाठोपाठ एक विजय मिळवत नॉर्वेच्या या खेळाडूने सात सामने जिंकले आणि केवळ दोन सामने अनिर्णीत ठेवून 26 गुण मिळवले, जे एकूण क्रमवारीत वेई यी याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने जास्त भरले. पोलंडच्या डुडा जॅन-क्रिझस्टोफन 19.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आणि प्रज्ञानंद त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे राहिला.
अर्जुन एरिगेसी 18 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला, तो नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हपेक्षा (17.5) अर्ध्या गुणाने पुढे राहिला. पहिल्या दिवशी तीन शानदार विजयांसह सुऊवात केलेला किरिल शेवचेन्कोव्ह एकूण 17 गुणांसह सातव्या स्थानावर राहिला, तर अनीश गिरीने 14 गुणांसह आठवे स्थान पटकावले. जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर 13.5 गुणांसह नवव्या स्थानावर राहिला तर जागतिक विजेतेपदाचा आव्हानवीर डी. गुकेश पूर्ण एका गुणाने त्याच्या मागे राहिला. गुकेशवर या स्पर्धेत संघर्ष करण्याची वेळ आली.