भारतीय महिला संघाचा सलग चौथा विजय

भारतीय महिला संघाचा सलग चौथा विजय

वृत्तसंस्था/ सिलेथ
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे 56 धावांनी पराभव करत सलग चौथा विजय नोंदविला. भारतीय महिला संघ आता या मालिकेत बांगलादेशचा एकतर्फी पराभव करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या मालिकेतील चौथ्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 14 षटकांचा खेळ खेळविण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 14 षटकात 6 बाद 122 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 14 षटकात 7 बाद 68 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 56 धावांनी गमवावा लागला. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारताच्या डावामध्ये कर्णधार कौरने 26 चेंडूत 5 चौकारांसह 39, रिचा घोषने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, स्मृती मानधनाने 18 चेंडूत 3 चौकारांसह 22, हेमलताने 14 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 22, सजनाने 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्लेच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 2 गडी गमविले. भारताने 5.5 षटकात 2 बाद 48 धावा जमविल्या असताना पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला. बांगलादेशतर्फे मारूफा अख्तर आणि रबिया खान यांनी प्रत्येकी 2 तसेच एस. खातूनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या दिलारा अख्तरने 25 चेंडूत 2 चौकारांसह 21, रूबिया हैदरने 1 चौकारांसह 13 आणि शोरिफा खातूनने 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. भारतातर्फे दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 2 तर पूजा वस्त्रकार व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशने पॉवरप्लेच्या 4 षटकात 21 धावा जमविताना 1 गडी गमविला. बांगलादेशचे अर्धशतक 65 चेंडूत फलकावर लागले. त्यांच्या डावामध्ये 7 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक : भारत 14 षटकात 6 बाद 122 (स्मृती मानधना 22, हेमलता 22, रिचा घोष 24, हरमनप्रित कौर 39, अवांतर 4, मारूफा अख्तर आणि रबिया खान प्रत्येकी 2 बळी, एस. खातून 1-29), बांगलादेश 14 षटकात 7 बाद 68 (दिलारा अख्तर 21, रूबिया हैदर 13, शोरिफा खातून नाबाद 11, दिप्ती शर्मा व आशा शोभना प्रत्येकी 2 बळी, वस्त्रकार आणि राधा यादव प्रत्येकी 1 बळी).