खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना अटक

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना अटक

बेंगळूर विमानतळावर एसआयटीच्या पथकाची कारवाई : सहा दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणातील आरोपी हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना गुरुवारी मध्यरात्री बेंगळूर विमानतळावर एसआयटीच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी त्यांना बेंगळूरच्या 42 व्या एसीएमएम न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 6 दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. आता त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओप्रकरणी आरोप असणारे प्रज्ज्वल रेवण्णा मागील 34 दिवसांपासून विदेशात फरार होते. गुरुवारी दुपारी जर्मनीच्या म्युनिच येथून त्यांनी भारतात परतण्यासाठी प्रस्थान केले. मध्यरात्री 12:50 वाजता लुफ्तान्सा एअरलाईन्सचे विमान बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाच्या (सीआयएसएफ) जवानांनी प्रज्ज्वल रेवण्णा यांना ताब्यात घेऊन इमिग्रेशन अधिकाऱ्यांसमोर आणले. तेथे त्यांचे फिंगर प्रिंट व फोटो काढण्यात आले. नंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विशेष वाहनातून पॅलेस रोडवरील सीआयडीच्या इमारतीतील एसआयटीच्या कार्यालयात आणले.
एसआयटीच्या कार्यालयात आणण्यापूर्वी प्रज्ज्वलची विमानतळानजीकच्या खासगी इस्पितळात मध्यरात्री 1:25 च्या सुमारास वैद्यकीय चाचणी करण्यात आली. शुक्रवारी चौकशीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीच्या वकिलांनी प्रज्ज्वलना 15 दिवसांसाठी आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली, तर प्रज्ज्वलच्या वकिलांनी केवळ एक दिवस एसआयटीच्या ताब्यात दिले तरी पुरेसे आहे, असा युक्तिवाद केला.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी प्रज्ज्वल यांची शिवाजीनगर येथील बौरिंग आणि लेडी कर्झन इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रज्ज्वलना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना नाव, कोठे अटक झाली, अशी विचारणा केली. त्यावर प्रज्ज्वल यांनी उत्तर दिले. तसेच विश्रांती कक्ष आणि स्वच्छतागृहात अस्वच्छता नाही, असे सांगितले.
एसआयटीचे वकील अशोक नायक यांनी युक्तिवाद करताना, आरोपीचा मोबाईल सापडला आहे. त्याला फेस लॉक आहे. प्रकरण उघड होताच बचाव करून घेण्यासाठी ते विदेशात फरार झाले. मात्र, विदेश प्रवासाला गेल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी भारतात परतण्यासाठी बुकींग केलेली विमानतिकीटे दोनवेळा रद्द केली. विदेशात अटक होईल, अशी माहिती मिळाल्यनंतर ते देशात परतले आहेत. या प्रकरणात योग्य तपास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रज्ज्वल यांना आपल्या ताब्यात द्यावे, त्यांच्यावरील आरोप जन्मठेपेची शिक्षा होण्यासारखे आहेत, असे सांगितले.
दुसरीकडे प्रज्ज्वल यांचे वकील जी. अरुण यांनी प्रतिवाद करताना आरोपीवर दाखल झालेली प्रकरणे चार वर्षांपूर्वीची आहेत. या प्रकरणात जामीन देता येतो. प्रज्ज्वल यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना केवळ एक दिवसाची एसआयटी कोठडी दिली तरी पुरेसे आहे, असे सांगितले. युक्तिवाद-प्रतिवाद झाल्यानंतर न्यायालयाने प्रज्ज्वलना 6 दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात दिले.
मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी जर्मनीत केले होते पलायन
हासन लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तत्पूर्वी तीन दिवस अगोदर निजदचे उमेदवार असणारे प्रज्ज्वल यांच्याशी संबंधित व्हिडिओ असणारे पेनड्राईव्ह व्हायरल झाले होते. त्यामुळे मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी जर्मनीत पळ काढला होता. त्यांच्याविरोधात एसआयटीने समन्स बजावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी अज्ञात ठिकाणाहून व्हिडिओ जारी करत सहा दिवसांचा अवधी मागितला. मात्र, ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. त्यापाठोपाठ ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. परंतु, दोनवेळा परतीच्या विमानप्रवासाचे बुकींग केलेले तिकीट त्यांनी रद्द केले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी एसआयटीने विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंटही जारी केले होते. अखेर त्यांनी 27 मे रोजी हंगेरीच्या बुडापेस्ट येथून व्हिडिओ जारी करून 31 रोजी सकाळी एसआयटीसमोर हजर राहणार असल्याचे सांगितले होते.
एच. डी. रेवण्णांना उच्च न्यायालयाची नोटीस
पीडित महिलेचे अपहरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी जामीन मिळविलेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना जामीन मिळाला होता. मात्र, पीडित. महिलेच्या अपहरण प्रकरणात मिळालेला त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करून एसआयटीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने एच. डी. रेवण्णा यांना नोटीस बजावली आहे.
भवानी रेवण्णा यांची जामीन याचिका फेटाळली
एसआयटीने खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने एसआयटीच्या ताब्यात दिले आहे. याच दरम्यान त्यांच्या मातोश्री भवानी रेवण्णा यांनी पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे भवानी रेवण्णा यांच्या अटकेची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी भवानी रेवण्णा यांनी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने भवानी रेवण्णा यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. भवानी यांच्यावतीने ज्येष्ठ वकील संदेश जे. चौटा यांनी तर एसआयटीच्यावतीने बी. एन. जगदीश यांनी युक्तिवाद केला.