बेळगाव-हिंडलगा रस्त्यावरील धोकादायक वृक्ष पडण्याच्या स्थितीत

बेळगाव-हिंडलगा रस्त्यावरील धोकादायक वृक्ष पडण्याच्या स्थितीत

झाड हटवण्याकडे वनखात्याचेही दुर्लक्ष
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव-हिंडलगा रस्त्यावरील विजयनगर हिंडलगा व येथील मुख्य मार्गावर ‘नाईक वाडा’ शेजारी 60 ते 70 वर्षांपूर्वीचे आंब्याचे जुनाट झाड आहे. गेल्या वर्षभरापासून या झाडाकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले असून हे झाड केव्हा पडेल, याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत.  बेळगाव-सावंतवाडी या मुख्य राजमार्गावर हा मोठा वृक्ष असून येथून पादचारी, दुचाकी, चारचाकी व मोठ्या ट्रॅक्स यांची नेहमी वर्दळ आहे. या वृक्षाच्या सुकलेल्या फांद्या अधूनमधून पडत आहेत. वृक्ष जुना झाल्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यात केव्हा पडेल याचा नेम नाही. या आंब्याच्या झाडाखालूनच रहदारी मोठ्याप्रमाणात असून अनेक मालवाहतूक टेम्पो या ठिकाणी उभ्या असतात. वृक्ष केव्हा पडेल याचा नेम नसल्यामुळे हे टेम्पोचालक आपल्या गाड्या 100 मीटर दूर अंतरावर उभ्या करत आहेत. हा धोकादायक वृक्ष तोडण्याबाबत वनखात्याला निवृत्त पंचायत विकास अधिकारी टी. एस. नाईक यांनी लेखी कळविले आहे. तरीदेखील याकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वनखात्याने अद्याप याची दखलच घेतली नाही. हा वृक्ष कोणाच्यातरी अंगावर पडून मोठे नुकसान झाल्यानंतरच वनखाते धावून येणार का? अशी जनता सवाल करीत आहे. या झाडाखालून विद्युत वाहिन्या देखील गेल्या असून हा धोकादायक वृक्ष केव्हा उन्मळून पडेल याची शाश्वती नाही. तरी याचे गांभीर्य लक्षात घेऊन वनखात्याने पावसाळ्यापूर्वी हा वृक्ष हटवावा तसेच या रस्त्याशेजारी असणारे इतर वृक्षदेखील शोधून तेही वृक्ष हटवावेत. कारण बेळगाव-सावंतवाडी रस्त्याच्या दुतर्फा ब्रिटिश काळामध्ये हे लावलेले जुनाट वृक्ष आहेत. याकरिता वनखात्याने अशा झाडांचा शोध घेऊन धोका होण्यापूर्वी हे वृक्ष हटवावेत, अशी मागणी होत आहे.