गुंजीत तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा उपद्रव

गुंजीत तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा उपद्रव

गटारींची स्वच्छता-गावात औषध फवारणी करण्याची मागणी : दुर्गंधीमुळे रोगराईचाही धोका
वार्ताहर /गुंजी
गुंजी गावात डासांचा मोठ्याप्रमाणात उपद्रव वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. गावातील तुंबलेल्या गटारी साफ न केल्याने गटारीत पाणी साचलेले आहे. त्यामुळे दुर्गंधीबरोबरच डासांचा उपद्रव गुंजीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुंजी ग्रामपंचायतीने त्वरित तेथील तुंबलेल्या गटारी साफ करून डासांसाठी औषध फवारणी करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. गुंजी परिसरात तपमान वाढले असून नागरिकांना उकाडा असह्य होत आहे. अशा स्थितीमध्ये घरामध्ये डासांचा सुळसुळाट सुरू असल्याने नागरिकांना रात्रीसुद्धा झोपेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर डास चावल्याने लहान मुलांच्या शरीरावरती फोड येत असून डेंग्यू, चिकूनगुनिया, मलेरिया अशा आजारांची धास्ती वाढली आहे. गटारीतील दुर्गंधीमुळेही नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी गुंजी ग्राम पंचायतीने गावातील गटारींची साफसफाई करून त्यावर डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी आग्रही मागणी होत आहे.
गटारींची साफसफाई नाहीच!
ग्रामपंचायतीकडून दरवर्षी केवळ एकदाच गटारींची साफसफाई केली जाते. मात्र गावातील गटारींची साफसफाई करताना एखाद्या कंत्राटदाराला साफसफाईचे काम सोपवून पंचायतीचे सदस्य निर्धास्त राहतात. त्यामुळे काही भागांमध्ये एकदाही गटारींची साफसफाई झाली नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून सदर गटारीवर गवत आणि वेली वाढल्याने गटारी आहेत की नाहीत, असा आभास निर्माण होत आहे. गटारीच्या साफसफाईवेळी सदर वार्डांच्या पंचायत सदस्यांनी लक्ष घालून सदर कंत्राटदाराकडून व्यवस्थित साफसफाई करून घेणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदार आणि सदस्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणची गटारे साफसफाईविना बुजली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
फवारणीची फॉगींग मशीन धूळखात
गुंजी ग्रामपंचायतमध्ये औषध फवारणी मशीन उपलब्ध आहे. मात्र पंचायतीने गावामध्ये अलीकडच्या काळात एकदाही या मशीनचा वापर करून फवारणी केलेली नाही. त्यामुळे सदर मशीन शोभेची वस्तू म्हणून ग्राम पंचायतमध्ये धूळखात पडल्याने गुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्यांच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांतून संतापाबरोबरच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याविषयी संबंधितांना विचारले असता पंचायतीमध्ये नवीन मशीन उपलब्ध आहे. मात्र लिक्विड नसल्याने अद्याप त्याचा एकदाही वापर केलेला नाही, असे सांगण्यात आले. तरी ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालून गावातील दुर्गंधी व डासांचा उपद्रव त्वरित दूर करावा, अशी मागणी होत आहे.