काणकोणातून जलमार्गाने कर्नाटकात दारूची चोरटी वाहतूक पुन्हा सुरू

काणकोणातून जलमार्गाने कर्नाटकात दारूची चोरटी वाहतूक पुन्हा सुरू

पाळोळे किनाऱ्यावर कारवाई, मोटरबोटीतून 1.85 लाखांची दारू जप्त
काणकोण : काणकोण तालुक्यातील पोळे, पाळोळे येथून जलमार्गाद्वारे कर्नाटकात बेकायदा दारू पाठविण्याचा प्रकार मागच्या कित्येक वर्षांपासून चालू असून मध्यंतरी यात खंड पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात पोळे चेकनाक्यावर कडक तपासणी चालू करण्यात आल्यानंतर या व्यवसायात असलेल्यांनी जलमार्गाचा परत वापर करायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मोटर लावलेल्या होडीतून कर्नाटकात दारूची तस्करी करत असल्याप्रकरणी पोळे येथील एका व्यक्तीला काणकोण पोलिसांनी अटक केलेली असून या होडीतून सुमारे 1.85 लाख रु. किमतीची दारू जप्त करण्यात आली. यासाठी पोलिसांनी पाळोळे किनाऱ्यावर आधी साध्या वेषात गस्त घातली. सध्या पाळोळे किनारपट्टी देशी पर्यटकांनी गजबजलेली असून मंगळवारी मध्यरात्री समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या सदर मोटरबोटीची झडती घेतली असता त्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या आणि सदर मद्य कर्नाटकात नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यासंबंधी एकाला अटक करून जामिनावर सोडण्यात आले असून काणकोणचे पोलीस पुढील तपास करत आहेत.