मृत्यूवर मात करणारा तारा

मृत्यूवर मात करणारा तारा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांना एका अशा तार्‍याची माहिती मिळाली आहे ज्याच्याबाबत असे म्हटले जात होते की हा तारा नष्ट होऊन जाईल; मात्र अलीकडेच संशोधकांनी या तार्‍याबाबत पुन्हा जाणून घेतले असता, त्याच्याबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली. हा तारा केवळ बचावलाच आहे असे नाही तर त्याने आपल्या आकारात 150 टक्क्यांची वाढ करून एक विशाल आकार धारण केला आहे.
या तार्‍याचे नाव आहे ‘बॅकडू’ (8 यूएमआय). हा तारा आता मोठा होऊन तो एका विशालकाय लाल तार्‍यामध्ये रुपांतरीत झाला आहे. याबाबतच्या संशोधनाची महिती ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल’ जर्नलमध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की हा तारा हेलियममध्ये जळत होता आणि त्याच्यामधील हायड्रोजन इंधन संपुष्टात आले होते. युनिव्हर्सिटी ऑफ हवाई इन्स्टिट्यूट ऑफ अस्ट्रॉनॉमीमधील मार्क होन यांनी याबाबतची माहिती दिली.
या तार्‍याची पुननिर्मिती तो आपल्या मूळ रुपात परत आल्यानंतर झाली असावी असे संशोधकांना वाटते. त्याने आपल्या आजूबाजूच्या जागेत स्वतःचे स्थान पक्के केले आहे. अर्थातच या तार्‍याबाबतची नवी माहिती संशोधकांसाठी आश्चर्याची तसेच कुतुहलाचीही आहे. एखाद्या तार्‍याचा स्फोट होऊन म्हणजे ‘सुपरनोव्हा’ची घटना होऊन मृत्यू झाला की त्याचे रुपांतर कृष्णविवरातही होऊ शकते.