पिर्ला-केपे येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा

पिर्ला-केपे येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा

पाच पॉवर टिलर्ससह नऊ यंत्रे जप्त, मुख्य रस्त्याशेजारीच चालू होती खाण
वार्ताहर /केपे
पिर्ला-केपे येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरेखाणीवर छापा मारून चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी नऊ यंत्रे जप्त करण्यात आली. खाण खाते, केपे मामलेदार, केपे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. यात पाच पॉवर टिलर्स आणि चार चिरे काढण्याची यंत्रे मिळून लाखो रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली. पिर्ला येथील नवीन पंचायतघराजवळच्या रस्त्याच्या बाजूला ही खाण गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. मुख्य रस्त्याच्या शेजारी जवळपास पाच हजार चौ. मी. जमिनीत व चार ठिकाणी अत्याधुनिक यंत्रे लावून चिरे काढण्यात येत होते. याविषयी खाण खात्याकडे तक्रार आली होती व त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे खाण खात्याचे अधिकारी जयवंत कामत यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत बेसुमार प्रमाणात चिरे काढणे सुरू झाले असून खाण खात्याची परवानगी न घेता चालणाऱ्या बेकायदा व्यवसायामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसुलाला मुकावे लागते. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पोलीस संरक्षणात खाणीवर छापा मारला. यावेळी नेहमीप्रमाणे नऊ यंत्रे लावून चिरे काढण्याचे काम सुरू होते. अधिकारी येत असल्याचे पाहून परप्रांतीय कामगारांनी सर्व यंत्रे तिथेच टाकून जंगलात पलायन केले. केपेचे संयुक्त मामलेदार साळगावकर यांनी तलाठ्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केपे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी पंचनामा केल्यानंतर संयुक्त मामलेदार साळगावकर यांनी त्यांना सर्व यंत्रे जप्त करण्याच्या सूचना दिल्या. यंत्रांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.