तालुक्यात होळी पारंपरिक पद्धतीने

तालुक्यात होळी पारंपरिक पद्धतीने

पाच दिवस अनेक गावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम : आंबील गाड्यांची मिरवणूकही
वार्ताहर /किणये
तालुक्यात होळीच्या सणाला मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे. काही गावांमध्ये रविवारी रात्री तर बहुतांशी गावांमध्ये  सोमवारी सकाळी होळी उभारण्यात आली आहे. होळी उभारताना पारंपरिक हलगी वाद्यांचा गजर करण्यात आला. यावेळी ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असे होळीसमोर म्हणत बालचमुंनी आनंद लुटला. तसेच होळीची पूजा सुरू असताना बोंब मारण्यात आली. ग्रामीण भागात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येऊ लागला आहे. रविवारी रात्री बऱ्याच गावांमध्ये आंबील गाड्यांची मिरवणूक काढरण्यात आली तसेच हलगीचा गजर करण्यात आला. रविवारी रात्री होळी उभारण्यासाठी लाकडे आणण्यात आली. गावागावांमधील हक्कदार व पुजारी यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. तसेच आंबीलगाडा ओढण्याची कसरत काही गावांमध्ये तरुणांनी केली.
आंबीलगाड्यांची मिरवणूक काढण्याआधी बहुतांशी गावांमध्ये नाचण्याची आंबील करतात. ती आंबील पूजेसाठी देण्यात येते. त्यानंतर आंबीलचे वाटप मिरवणूकदरम्यान करण्यात येते. त्याचबरोबर हरभरा, वाटाणा, मसूर, तूर, गहू आधी पाच प्रकारची कडधान्ये भिजवून त्याचे वाटप केले जाते. होळी उभारण्यासाठी जंगल परिसरातून लाकडे आणण्यात आली. होळीसाठी लागणारा नैवेद्य काही गावांमध्ये रात्री तर काही ठिकाणी सोमवारी सकाळी दाखवण्यात आला. होळी उभारण्याच्या बाजूलाच नारळाच्या झाडांच्या फांद्या व अन्य लाकडे रचून होळी पेटवण्याची परंपराही आहे. होळीच्या सणानिमित्त तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पाच दिवस कडक वार पाळणूक करण्यात आली आहे. वार पाळणूक करण्याची परंपरा फार वर्षापासूनची आहे. पाच दिवस अनेक गावांमध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असते. अनेक प्रकारच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवून पारंपरिक व धार्मिक नाट्याप्रयोग या दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहेत.
धुळवड  उत्साहात
तालुक्यात सोमवारी दुपारी चारनंतर धुळवड पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. गावागावांमध्ये हलगीच्या गजरात गावातील सर्व देवतांची पूजा केली. त्यानंतर बालचमू व काही गावातील तरुणांनी धुळवडीचा आनंद लुटला. अलीकडे अनेक गावांमध्ये काँक्रीट व सिमेंटचे रस्ते असल्यामुळे हा धुळवडीचा आनंद लुटताना बराच अडथळा निर्माण होत आहे. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये हा सण उत्साहाने साजरा करण्यात येऊ लागला आहे. होळीच्या सणानिमित्त बाहेरगावी गेलेले कामगार आपापल्या गावांमध्ये आले आहेत. पाच दिवस प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच अनेक आध्यात्मिक मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.