खानापुरातील ग्रामीण भागात रंगोत्सव जोमात

खानापुरातील ग्रामीण भागात रंगोत्सव जोमात

पश्चिम भागात पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम : रंगपंचमी शांततेत
खानापूर : शहरासह तालुक्यात होळी उत्सवाला सुरवात झाली. रविवारी होळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. हलगीच्या कडकडाटासह चिमुकल्यांचा होळीसमोर धरलेला फेर तसेच गावागावात परंपरेप्रमाणे घोडेमोडणी, चव्हाटाचे पूजन करून होळी उत्सवाला सुरवात करण्यात आली. सोमवारी बहुतांश ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सकाळपासूनच रंगपंचमी-धुळवडीला सुरवात झाली. ग्रामीण भागात बऱ्याच गावांमध्ये धुलीवंदन दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. अधिकाधिक गावात प्रथेनुसार रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. गावात धार्मिक विधीदेखील केल्या जातात. तालुक्याच्या काही भागात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात सकाळी सातपासूनच धुळवड-रंगपंचमीला सुऊवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त लुटला. गल्लोगल्लीतील युवक एकत्र येऊन गल्लीच्या कोपऱ्यावर रंगाची उधळण करण्यात दंग झाले होते. यासह अनेक युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगाची उधळण करताना महिला वर्ग व युवतींचाही सहभाग होता. हलगीच्या तालावर रंग उधळताना नृत्याचाही आनंद लुटण्यात आला. ग्रामीण भागात रंगपंचमी असल्याने खानापूर बाजारपेठेत अजिबात लोकांची वर्दळ नव्हती. शासकीय कार्यालय व बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. तालुक्यात पश्चिम भागात होळी उत्सवाला कोकण संस्कृतीची छाप आहे. तर तालुक्याच्या संपूर्ण पूर्व भागात कर्नाटकची छाप असून पूर्व भागात कानडी पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात येतो. पश्चिम भागात पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह रंगमालाचे विशेष आकर्षक आहे. या रंगमाल कार्यक्रमात पौराणिक कथन सादर करण्यात येते. तसेच गावोगावी नाट्याप्रयोगाचेही आयोजन करण्यात येते.  प्रथेप्रमाणे नंदगड, लोंढा, बिडी, पारिश्वाड, कारलगा, बेकवाड, झुंजवाड, क. नंदगड, खैरवाड, भुत्तेवाडी, चन्नेवाडी, गर्बेनहट्टी, करंबळ तसेच तालुक्याच्या अनेक गावात सकाळपासूनच रंग उधळणीला प्रारंभ झाला. त्यामध्ये युवा पिढीबरोबरच गावातील अबाल वृद्धानीही सहभाग घेतला होता. यावेळी सर्व ठिकाणी रंगपंचमी अत्यंत शांततेने पार पडली. ग्रामीण भागात युवकांनी पार्ट्यांचाही आनंद लुटला.