उकाड्याने हैराण…वळिवाची प्रतीक्षा

उकाड्याने हैराण…वळिवाची प्रतीक्षा

उष्म्यात वाढ, गारव्याची अपेक्षा : शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
बेळगाव : मागील काही दिवसांपासून उष्म्यात उच्चांकी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यातून सुटका मिळविण्यासाठी नागरिक जोरदार वळिवाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. गतवर्षी वळिवाचा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने डिसेंबरपासूनच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साऱ्यांना आता वळिवाची प्रतीक्षा लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे पारा 38 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सर्व जीवांची घालमेल होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत गारव्यासाठी पावसाची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
शहराला पावसाची हुलकावणी
मागील आठवड्यात तालुक्यातील काही भागात वळिवाचा दमदार पाऊस झाला आहे. विशेषत: पश्चिम भागात हा पाऊस बरसला आहे. मात्र, शहरासह इतर भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. वाढत्या उकाड्याला तोंड देण्यासाठी सर्वत्र वळीव पावसाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. वाढत्या उन्हाने पिके करपून जाऊ लागली आहेत. नदी-नाले आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची धडपड होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास पिकांना जीवदान मिळणार आहे. त्याचबरोबर मशागतीलाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. पावसाअभावी वनक्षेत्रातील वन्यप्राणी सैरभैर होऊ लागले आहेत. चारा-पाण्याविना हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढू लागला आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वळीव पाऊस झाल्यास वन्यप्राण्यांनाही दिलासा मिळणार आहे.
काहीअंशी पाणी समस्या दूर होईल…
वाढत्या उन्हाबरोबर सर्वत्र पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. अशा परिस्थितीत वळिवाचा पाऊस झाल्यास काहीअंशी पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. सर्वत्र पाणीबाणी समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. दुपारच्या वेळेत सर्वत्र रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे सकाळी अन् सायंकाळच्या वेळेत बाहेर पडणे पसंत केले जात आहे. अशा परिस्थितीत थोडासा गारवा देण्यासाठी पावसाची गरज आहे.