झाडांच्या फांद्यांमुळे हेस्कॉमचा वांदा

झाडांच्या फांद्यांमुळे हेस्कॉमचा वांदा

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान : धोकादायक झाडांमुळे पंधरा विद्युतखांबांची हान
बेळगाव : वळिवाच्या पावसाने मागील दोन दिवसांत बेळगाव शहरासह उपनगराला दणका दिला. जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे व फांद्या कोसळून विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी निवेदन देऊनदेखील झाडांच्या फांद्या तोडण्याकडे वनविभागाने असमर्थता दाखविली. हेस्कॉमने अनेकवेळा पत्र लिहूनही वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात शंभरहून अधिक ठिकाणी धोकादायक झाडे व फांद्या आहेत. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युतवाहिन्यांवर कोसळत आहेत. यामुळे विद्युतवाहिन्यांचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा नसल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी व रविवारी शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. बऱ्याच ठिकाणी सोमवारी सकाळीच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
हेस्कॉम कर्मचाऱ्यांवरच तक्रार
पावसाळा जवळ आला तरी वनविभागाने धोकादायक झाडे व फांद्या हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हेस्कॉम कर्मचारी झाडांच्या फांद्या हटवत आहेत. परंतु, विनाकारण झाड तोडल्याचा ठपका ठेवत वनविभागाकडून हेस्कॉम कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जात आहेत. त्यामुळे झाडांच्या फांद्या तोडण्यास हेस्कॉमचे कर्मचारी तयारी दर्शवत नाहीत. यामुळे वारंवार विद्युतवाहिन्यांचे नुकसान होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. केवळ शहरात 15 ठिकाणी विद्युतखांब कोसळले असून सात ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले आहेत. तसेच विद्युतवाहिन्या तुटून नुकसान झाले आहे. यामुळे हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. चार वर्षांपूर्वी बेळगाव विभागाच्या मुख्य वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हेस्कॉम, वनविभाग, मनपा यांची संयुक्त बैठक होऊन धोकादायक झाडांची यादी तयार केली होती. तशाच पद्धतीने यावर्षीही धोकादायक वृक्षांची यादी तयार करून ज्या ठिकाणी झाड तोडणे गरजेचे नाही, तेथील फांद्या तोडून विद्युतवाहिन्यांना जागा करून देण्याची मागणी होत आहे.
वनखात्यामुळे विद्युतवाहिन्यांचे नुकसान
मागील दोन दिवसांत शहरासह उपनगरात झालेल्या पावसामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. धोकादायक झाडे व फांद्या पडून विद्युतवाहिन्या, खांब, ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वनविभागाला अनेकवेळा विनंती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने विद्युतवाहिन्यांचे नुकसान होत आहे.
– संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)