सुट्यांमुळे रेल्वे बुकिंगला भरघोस प्रतिसाद

सुट्यांमुळे रेल्वे बुकिंगला भरघोस प्रतिसाद

पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांमुळे रेल्वेंचे बुकिंग होतेय फुल्ल
बेळगाव : उन्हाळी सुट्यांना सुरुवात झाल्याने परगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकावर अॅडव्हान्स बुकिंग करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेस्थानकावरील बुकिंग काऊंटरवर सोमवारी प्रवाशांची गर्दी झालेली दिसून आली. बेंगळूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद यासह अयोध्या या शहरांना जाण्यासाठीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. सुट्यांचा कालावधी असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्पेशल रेल्वे सुरू केल्या आहेत. या स्पेशल रेल्वेंना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. बेळगाव-गोमतीनगर, हुबळी-ऋषिकेश, हुबळी-मुझफ्फरपूर, हुबळी-अहमदाबाद, म्हैसूर-अजमेर या स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. आठवड्यातील मोजक्याच दिवशी या एक्स्प्रेस सुरू केल्याने प्रवाशांची सोय होत आहे. हुबळी-ऋषिकेश व बेळगाव-गोमतीनगर या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे उत्तर भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. उन्हाळी सुट्यांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेंचे बुकिंग अल्पावधीतच पूर्ण होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तर भारतात जाण्यासाठी आणखी काही एक्स्प्रेसची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
बुकिंग काऊंटरवर गर्दी
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक असणाऱ्या बुकिंग काऊंटरवर सोमवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी झाली होती. आपण कोठे प्रवास करणार आहोत, यासाठीचा अर्ज भरून तो बुकिंग काऊंटरवर आधारकार्ड क्रमांकासह द्यावा लागतो. त्यानंतरच प्रवाशांचे बुकिंग करून घेतले जाते. अॅडव्हान्स बुकिंग करण्यासाठी काऊंटरवर रांगा लागत आहेत. ज्या प्रवाशांना ऑनलाईन बुकिंग करणे शक्य नसते, ते काऊंटरवर जाऊन बुकिंग करतात.