महाड ‘एमआयडीसी’मध्ये भीषण अपघात २ ठार; २ गंभीर

महाड ‘एमआयडीसी’मध्ये भीषण अपघात २ ठार; २ गंभीर

रायगड / प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहती मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोची धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी आहेत. हा अपघात कोप्रान कंपनी जवळ झाला असून या अपघाताची नोंद महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
महाड अतिरिक्त औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या सोलम कोंड ढेबेवाडी येथील चार तरुण प्रिव्ही ऑर्गानिक्स या कंपनीमध्ये रात्री ११ वाजता रस्त्याच्या बाजूने चालत रात्रपाळी साठी कामावर जात असताना मागील बाजूने  भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने ( एमएच ४८-  बीएम /२८३३) चौघांनाही जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सोलमकोंड ढेबेवाडी (ता. महाड) येतील रवींद्र धोंडीबा ढेबे वय १९ आणि सतीश शिवाजी ढेबे वय १९ या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष ढेबे आणि निलेश ढेबे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बिरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक चंदन रामकुवर राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, या अपघाताची नोंद महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.