धारगळ येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

धारगळ येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

अपघात की घातपात ? : पेडणे पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान
पेडणे : दाडाचीवाडी धारगळ येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास  टेम्पो रिक्षाने स्कूटरला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर (49, दाडाचीवाडी, धारगळ) यांचा मृत्यू झाला. मात्र धडक दिलेल्या टेम्पो रिक्षाने घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे सदर अपघात हा अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत असून सदर टेम्पो रिक्षा चालकाला शोधणे पेडणे पोलिसांसमोर आव्हान आहे. टॅक्सी व्यावसायिक असलेले देविदास कोनाडकर हे नागझर येथून आपल्या स्कूटरने (जी.ए 11 एफ 3368) घरी येत असता दाडाचीवाडी- धारगळ येथे पोहोचले असता गुड्स करियर टेम्पो रिक्षाने मागून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूटरसह ते रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनचालकाने वाहनासह पलायन केले. देविदास कोनाडकर यांना उपचारासाठी कासारवर्णे येथील सरकारी इस्पितळात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह गोमेकॉत पाठवला आहे. शवचिकित्सा अहवाल अजून मिळालेला नाही. देवीदास कोनाडकर यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कासारवर्णे येथून पीर्ण मार्गे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोणाला न कळता गुपचूप नेण्यात आला त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. जर हा घातपात नसेल तर हा मृतदेह लपून-छपून का नेला असा प्रश्न  स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
पेडणे पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली असून नागरिकांचे तसेच टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, हा अपघात नसून घातपात झालेला आहे. त्यादिशेने पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर हे तपास करत आहेत. अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेल्यानंतर स्थानिक आणि वाहन चालकांनी नागझर येथे विमानतळाचा मुख्य रस्ता सुमारे तीन तास रोखून धरला. जोपर्यंत संशयिताला पेडणे पोलीस अटक करत नाहीत आणि त्याला शिक्षा करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता अडवणार, असा इशारा  दिला. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना माहिती मिळताच त्यांनी  पेडणे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, मृत इसमाचा एक कान कापून टाकलेल्या स्थितीत अपघातस्थळी सापडला त्यामुळे हा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासाठी पेडणे पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्याचे मोठे आव्हान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.