दिल्लीच्या विजयाने राजस्थान प्ले ऑफमध्ये

दिल्लीच्या विजयाने राजस्थान प्ले ऑफमध्ये

लखनौ 18 धावांनी पराभूत : प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर : पोरेल, स्टब्जची  अर्धशतके : इशांत शर्माचे 3 बळी
वृत्तसंस्था/ दिल्ली
आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेल व ट्रिस्टन स्टब्जच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 208 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला 9 बाद 189 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. 34 धावांत 3 बळी घेणाऱ्या इशांत शर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दिल्लीने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल 5, डिकॉक 12, स्टोनिस 5 आणि दीपक हुडा 0 धावा काढून बाद झाले. लखनौला 4.1 षटकात 44 धावांमध्ये चार धक्के बसले होते. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर निकोलस पूरनने झुंज दिली. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. युवा आयुष बडोनीला फक्त सहा धावा काढता आल्या. कृणाल पांड्यानं पूरनला साथ दिली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पंड्याने 18 चेंडूत 18 धावा केल्या. पूरनने 27 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह 61 धावांची खेळी साकारली. पूरन बाद झाल्यानंतर सामना दिल्ली सहज जिंकणार असेच वाटत होते. पण अर्शद खान एकट लढला. अर्शदने 33 चेंडूमध्ये नाबाद 58 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने पाच षटकार आणि तीन चौकार ठोकले. युद्धवीर सिंहने 14, रवि बिश्नोई दोन आणि नवीन उल हकने दोन धावा केल्या. लखनौला 20 षटकांत 9 बाद 189 धावा करत आल्या व त्यांनी हा सामना 19 धावांनी गमावला. दिल्लीकडून इशांन शर्माने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शद खानने पहिल्याच षटकात धोकादायक जेक मॅकगर्कला तंबूचा रस्ता दाखवला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या मॅकगर्कला भोपळाही फोडता आला नाही. पण अभिषेक पोरेलने मॅकगर्कची कमी जाणवू दिली नाही. पोरेलने चौफेर फटकेबाजी करताना लखनौच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पोरेलला शाय होपने चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. होपने 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. पोरेलने 33 चेंडूमध्ये 58 धावांचा पाऊस पाडला. आपल्या वादळी खेळीमध्ये त्याने चार षटकार आणि पाच खणखणीत चौकार ठोकले.
दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 73 धावा जमविताना 1 गडी गमविला. दिल्लीचे अर्धशतक 24 चेंडूत, शतक 56 चेंडूत, दिडशतक 95 चेंडूत तर द्विशतक 117 चेंडूत फलकावर लागले. पोरलने 21 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. पोरा आणि होप यांनी अर्धशतकी भागादारी 23 चेंडूत नोंदविली. कर्णधार पंत आणि स्टब्ज यांनी अर्धशतकी भागीदारी 31 चेंडूत केली. स्टब्जने 22 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. स्टब्ज आणि पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी 22 चेंडूत नोंदविली. लखनौ संघातर्फे मोहसीन खानच्या जागी आयुष बदोनीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 4 बाद 208 (अभिषेक पोरेल 58, हॉप 38, पंत 33, स्टब्ज नाबाद 57, अक्षर पटेल नाबाद 14, अवांतर 8, नवीन उल हक्क 2-51, अर्षद खान 1-45, बिस्नोई 1-26). लखनौ सुपर जायंट्स 20 षटकात 9 बाद 189 (पुरन 61, अर्षद खान नाबाद 58, युधवीर सिंग 14, कृणाल पंड्या 18, डि कॉक 12, अवांतर 6, इशांत शर्मा 3-34, खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, स्टब्ज प्रत्येकी 1 बळी).
राजस्थान प्लेऑफमध्ये, दिल्ली शर्यतीत, लखनौचा संघ अडचणीत
दिल्लीच्या विजयाचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. राजस्थानचा संघ 12 सामन्यात 16 गुणासह दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीने विजय मिळवत लखनौला 16 गुणापर्यंत जाण्यापासून रोखले. यामुळे हैदराबाद व चेन्नई हे दोनच संघ 16 गुणापर्यंत पोहोचणारे संघ राहिले आहेत. यामुळे लखनौच्या पराभवामुळे राजस्थानचा प्लेऑफचा मार्ग सुकर झाला. दिल्लीने ग्रुप स्टेजमधील सर्व 14 सामने खेळले आहेत. दिल्ली संघ आता 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हैदराबाद, चेन्नई आणि लखनौ संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. मात्र, हे सर्व असूनही दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण दिसत आहे. कारण त्यांचा खराब नेट रनरेट. दुसरीकडे लखनौचा शेवटचा सामना अजून बाकी आहे. आतापर्यंत त्यांनी 13 पैकी 6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण आहेत. लखनौ 7 व्या क्रमांकावर आहे. दिल्लीविरुद्ध पराभवाने लखनौचे गणितही पूर्णपणे बिघडले आहे. यामुळेच शेवटचा सामना जिंकूनही लखनौला प्लेऑफमध्ये जाणे खराब नेट रनरेटमुळे कठीण झाले आहे.