राजस्थान ‘प्ले-ऑफ’चे स्थान निश्चित करण्यास सज्ज

राजस्थान ‘प्ले-ऑफ’चे स्थान निश्चित करण्यास सज्ज

वृत्तसंस्था/ गुवाहाटी
रियान पराग हा भारताच्या ईशान्येकडून उदयास आलेला सर्वांत लोकप्रिय क्रिकेट खेळाडू असून आज बुधवारी राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्जचा सामना करताना घरच्या चाहत्यांकडून त्याचे भव्य स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये राजस्थानची आणखी एक लढत बाकी राहिलेली असून प्ले-ऑफमधील प्रवेश सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
16 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल्सला गुवाहाटीमध्ये होणऱ्या पुढील दोन ‘होम’ सामन्यांमध्ये एक तरी विजय मिळविणे आवश्यक आहे. अग्रणी चार संघांमधील स्थान निश्चित करण्यासाठी ते पुरेसे ठरेल. गेल्या काही वर्षांपासून गुवाहाटी ही रॉयल्सची दुसरी होम बेस’ राहिली आहे. परागने यंदा सलामीवीर नसतानाही 153 च्या स्ट्राइक-रेटने 483 धावा जमविताना उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे.
या 22 वर्षांच्या खेळाडूला आज गुवाहाटीत भरपूर पाठिंबा मिळेल आणि पंजाब किंग्जविऊद्ध खेळताना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाला ते मदतकारी ठरेल. पंजाबलाही शशांक सिंग आणि आशुतोष शर्मामध्ये दोन उत्कृष्ट टी-20 खेळाडू गवसले आहेत. परंतु संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यात ते पुन्हा अपयशी ठरलेले आहेत. कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे हंगामात बराच काळ खेळू शकलेला नसून त्याच्या अनुपस्थितीमुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कारण त्याचा हंगामी कर्णधार सॅम करन हा तितका प्रभावी दिसलेला नाही.
दुसरीकडे, सॅमसनचा हा फलंदाज या नात्याने सर्वोत्तम हंगाम राहिलेला असून कर्णधार म्हणूनही त्याने छाप पाडली आहे. तो 486 धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यशस्वी जैस्वाल (344 धावा) आणि जोस बटलर (359 धावा) या सलामीच्या धडाकेबाज जोडीसाठी त्यांच्या दर्जाचा विचार करता हा हंगाम सामान्य राहिलेला आहे. पण पराग आणि सॅमसन यांनी वेळोवेळी फलंदाजीला बळकटी दिली आहे आणि सातत्य राखले आहे. याला अपवाद फक्त चेन्नईविरुद्धचा सामना राहिला आहे.
राजस्थानचा सर्वांत मजबूत पैलू म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. शेवटच्या षटकांत संदीप शर्मा (इकॉनॉमी रेट 8.07) आणि सुरुवातीच्या टप्प्यात ट्रेंट बोल्ट (इकॉनॉमी रेट 8.38) यांनी त्यांच्या योजना चांगल्या पद्धतीने अंमलात आणल्या आहेत. रविचंद्रन अश्विन स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली आहे तसतसा अधिक धारदार झाला आहे आणि युजवेंद्र चहल नेहमीप्रमाणे कधीही तडाखा देण्याची क्षमता बाळगतो.
संघ : पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल, तनुष कोटियन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.