राजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा

राजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा

नरेंद्र राठोड (ठाणे)

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका जमिनीच्या भूखंडावरून हा वाद उफाळून आला अन् तो इतका विकोपाला गेला की एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने थेट पोलिस ठाण्यातच अंदाधुंद गोळीबार केला. तीन वेळा आमदारकी जिंकलेल्या नेत्याने कायदा, प्रशासन, जनता, पद, पक्ष अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता असा बेछूट गोळीबार केल्याचे द़ृश्य पाहून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतोय, की खरंच हा सारा थरार फक्त एका भूखंडाच्या वादातून घडलाय? की यामागे पडद्यामागील राजकीय वादाची अद़ृश्य किनार आहे?  ( Pudhari Crime Diary )
संबंधित बातम्या 

Pudhari Crime Diary : (अ) मानवी तस्करी!
Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी
Crime Diary : गुन्हेगारांचा सणकीपणा! वाचा ‘इम्पल्स कंट्रोल डिसॉर्डर’विषयी

आमदार गणपत गायकवाड हे पूर्वी रिक्षा चालक होते. नंतर त्यांनी केबल व्यवसायात आपला जम बसवला. व्यवसाय करता करता त्यांनी लोकसंपर्क वाढवून कल्याण पूर्व येथून थेट अपक्ष म्हणून आमदारकी लढवली व ती जिंकली देखील. दोन टर्म अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. याच दरम्यान शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी देखील कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून खासदारकी मिळवली. त्यानंतर स्थानिक विकास निधी आणि विकास कामाचे श्रेय या कारणावरून आमदार गायकवाड व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात हळूहळू धुसफुस वाढू लागली.
दुसरीकडे राज्याच्या सत्ता समीकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात भरघोस निधी देऊन विकासकामांचा सपाटा लावला. याच विकास कामाच्या निधीवरून व कामाचे श्रेय घेण्यावरून भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली.
भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या युतीनंतर राज्यात अनेक ठिकाणी आगामी निवडणुकांच्या जागेवरून पेच निर्माण होऊ लागला. त्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सर्व प्रथम शिंदे गटाच्या विरोधात जाऊन कल्याण पूर्वच्या विधानसभा जागेवर भाजपचा हक्क असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर शिंदे गटानेदेखील कल्याण मध्ये आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचे नातेवाईक व एकमेकांचे जुने वैरी असलेल्या महेश गायकवाड यांना ताकद दिली.
महेश गायकवाड यांना कल्याण शहर प्रमुख पद देऊन शिंदे गटाने त्यांना राजकीय बळ दिले. त्यामुळे महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड हे दोघेही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर येऊ लागले. याच दरम्यान महेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण परिसरात त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लावण्यात आले. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत महेश गायकवाड हे गणपत गायकवाडांसमोर आव्हान उभे करतील, हे स्पष्ट झाले होते.
दोन्ही गायकवाडांमध्ये पडद्याआड वादाची ठिणगी धगधगत असतानाच द्वारली गावातील एका 25 कोटीच्या भूखंडावरून महेश गायकवाड व गणपत गायकवाड पुन्हा एकदा आमने-सामने आले. हा वादग्रस्त भूखंड एकनाथ जाधव नामक व्यक्तीचा असून त्यांच्या वडिलांनी हा भूखंड प्रमोद रंका या बिल्डराला विकसित करण्यासाठी 27 वर्षांपूर्वी दिला होता.
ज्या कंपनीस हा भूखंड दिला गेला होता, त्या कंपनीत जितेंद्र पारीख व आमदार गणपत गायकवाड हे देखील भागीदार आहेत. मात्र, या जागेचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, असा आरोप करीत जागा मालक जाधव कुटुंबीयांनी ही जागा देण्यास विरोध दर्शवला होता. तर आमदार गायकवाड यांनी न्यायालयातून जमिनीचा ताबा घेण्यासाठी आदेश आणला होता. त्यानंतर जागा मालक जाधव कुटुंबीयांनी या प्रकरणात महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेऊन जमिनीचे पैसे मिळवून देण्यासाठी त्यांची मदत मागितली.
दरम्यान,आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा कामगारांना घेऊन या भूखंडावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यास गेला होता. त्याच वेळी महेश गायकवाड तेथे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले व त्यांनी या जागेवर बांधलेली भिंत पाडून टाकली. या वादानंतर आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव हिललाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. त्याच वेळी महेश गायकवाड देखील साथीदारांसह हिललाईन पोलिस ठाण्यात आला. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड, राहुल पाटील व अन्य एक जण असे चार जण दालनात होते.
अचानक गणपत गायकवाड यांनी आपल्याकडील पिस्तूलमधून महेश गायकवाड यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याचवेळी आमदार गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे हा देखील दालनात आला व त्याने त्याच्याकडील पिस्तूलमधून गोळी झाडली. यावेळी एकूण दहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी सहा गोळ्या महेश यांना, तर दोन गोळ्या राहुल पाटील यांना लागल्या. ( Pudhari Crime Diary )
The post राजकीय वादाची ठिणगी; भूखंड वादाचा वणवा appeared first on Bharat Live News Media.