कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची अफवा उज्ज्वल निकम यांनीच पसरवली- शशी थरूर

कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची अफवा उज्ज्वल निकम यांनीच पसरवली- शशी थरूर

अजमल कसाबला तुरूंगामध्ये बिर्याणी खायला दिली जात असल्याची अफवा ही उज्ज्व निकम यांनीच पसरवल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे.  माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांची एका पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली असल्याच्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्याचे समर्थन करताना त्यांनी उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात झालेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते (एलओपी) जेव्हा सार्वजनिक डोमेनवर अशा प्रकारचा आरोप करतात तेव्हा चौकशी ही झालीच पाहीजे असा आग्रहही त्यांनी केला.
ख्यातनाम वकिल उज्जल निकम यांना मुंबईतून भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर धक्कादायक आरोप केले. महाराष्ट्र एटीसचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या दहशतवाद्यांच्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीतून झाली नसून ती आरएसएसच्या जवळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी त्या पोलीसाला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
वडेट्टीवारांच्या या आरोपानंतर राजकारण चांगलेच तापले असून आता या प्रकरणावर अनेक राजकिय प्रतिक्रिया समोर येत आहेत. या वादात आता शशी थरूर यांनीही उडी घेतली असून त्यांनी वडेट्टीवार यांच्या दाव्याला पाठींबा देताना याच्या चौकशीची मागणी केली आहे.
ते म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जेव्हा विरोधी पक्षनेता सार्वजनिक डोमेनमध्ये आरोप करत असून या प्रकरणामध्ये काय घडलयं हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला आहे.”असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे आरोप करताना त्यांनी अजमल अमीर कसाबला तुरुंगात बिर्याणी दिली गेली दावा तत्कालीन सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी केल्याचा दाखला देता त्याचा समाचार घेताना, “पाकिस्तानी दहशतवाद्याला तुरुंगात बिर्याणी खायला दिली होती अशी अफवा उज्ज्वल निकम यांनी पसरवली होती. उज्ज्वल निकम आपला राजकीय पक्षपात या अगोदरच उघड केला असून त्यांच्या हा राजकीय पक्षपातीपणा इतर प्रकरणावर घडून आला आहे काय याची चिंता आहे. त्यामुळेच आम्ही उज्ज्वल निकम यांच्या चौकशीची मागणी केली आहे.” अशी त्यांनी म्हटलं आहे.