ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा संघटना नेत्यांचा निर्णय : बिले त्वरित देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करण्याची मागणी
बेळगाव : खरीप हंगामातील शेतीची कामे गतीने सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी पेरणी केली जात आहे. मात्र कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापी उसाची बिले देण्यात आली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदर बिले त्वरित देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करावी अशी मागणी रयत संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातच सरकारकडून तुटपुंजी भरपाई देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस पुरवठा केला असला तरी उसाची बिले शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाहीत. कारखान्याकडे चौकशी केली असता केवळ आश्वासने दिली जात आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज मोठी आहे.अशा परिस्थिती कारखानदारांकडून बिले अदा करण्यात आली नसल्याने शेतक्रयांसमोर आर्थिक प्रश्न उभा ठाकला आहे.
थकवलेली उसाची बिले त्वरित द्या
जिल्हा प्रशासनाने बिले अदा न केलेल्या साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांची बिले त्वरित देण्याचा आदेश जारी करावा. अशी मागणी शेतक्रयांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन थकवलेली उसाची बिले त्वरित देण्यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात येणार आहे. कारखान्यांच्या प्रतिनिधींची त्वरित बैठक घेऊन आदेश जारी करावा, अन्यथा जिल्हा प्रशासनासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
बिले मिळाली नसल्याच्या तक्रारी
कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप बिले देण्यात आली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उसाचे बिल कारखान्यांकडून वसूल करून देण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. यापूर्वीही निवेदन देण्यात आले आहे. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. यावेळी धरणे आंदोलन करू. असा इसारा देण्यात आला आहे.
-आप्पासाहेब देसाई शेतकरी नेते