शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ

शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ

धामणे, हालगा, बस्तवाड, जुने बेळगाव, वडगाव भागात वळिवामुळे दिलासा
वार्ताहर /धामणे
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धामणे, हालगा, बस्तवाड, जुने बेळगाव, वडगाव या भागात यंदा वळीव पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी चांगली मदत झाली आहे. या भागातील शेतकरी मशागतीच्या कामाला जोमाने लागले आहेत. कारण येत्या 24 मे रोजी रात्री 3 वाजून 15 मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे रोहिणी नक्षत्रापासून भात पेरणीला सुरुवात केली जाते. त्यामुळे निसर्गाची साथ मिळणे शेतकऱ्यांना महत्त्वाचे असते. यंदा धामणे, हालगा, बस्तवाड, जुने बेळगाव, वडगाव या भागात शेतकऱ्यांना गेल्या कांही दिवसांपूर्वी वळीव पाऊस बऱ्यापैकी पडल्याने या भागातील शेतकऱ्यांना थोडीफार निसर्गाची साथ मिळाली आहे. त्यामुळे या भागात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. शेतातील बांधावर माती टाकणे, शेतात कुळविणे ही कामे शेतकरी ट्रॅक्टरने तर काही शेतकरी बैलांच्या सहाय्याने मशागतीच्या कामाला लागले आहेत. परंतु देसूर, सुळगा (येळ्ळूर), राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागात यंदा वळीव पावसाने यंदा पाठ फिरविल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अजून तशीच राहिली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे. कारण पेरणीचे दिवस कमी राहिले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.