ऑस्ट्रेलियन महिला संघाचा सलग दुसरा विजय

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा सलग दुसरा विजय

बांगलादेशचा 58 धावांनी पराभव, वेअरहॅम सामनावीर, मॉलिन्यू, गार्डनरचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ मीरपूर
यजमान बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये सुरु असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपला सलग दुसरा विजय नोंदविला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेवर आपला कब्जा केला आहे. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 58 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वेअरहॅमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 161 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 9 बाद 103 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ग्रेस हॅरिसने 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47 तर वेअरहॅमने 30 चेंडूत 10 चौकारांसह 57, मॅकग्राने 2 चौकारांसह 19 तर इलेसि पेरीने 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. हॅरिस आणि वेअरहॅम यांनी दुसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी 54 चेंडूत नोंदविली. बांगलादेशतर्फे फरिहा तृष्णाने 19 धावांत 4, नाहिदा अख्तरने 21 धावांत 2 तसेच फहिमा खातूनने 34 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 1 गडी गमाविला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 64 चेंडूत तर दीडशतक 107 चेंडूत फलकावर लागले. वेअरहॅमने 26 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज लवकर बाद झाले. सलामीच्या दिलारा अख्तरने 25 चेंडूत 5 चौकारांसह 27, फहिमा खातूनने 1 चौकारासह 15 तर एस. अख्तरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21, रबिया खानने 1 चौकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनर आणि मॉलिन्यू यांनी प्रत्येकी 3 तर स्कूपने 2 व वेअरहॅमने 1 गडी बाद केला. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 1 गडी गमाविला. बांगलादेशचे अर्धशतक 64 चेंडूत तर शतक 120 चेंडूत नोंदविले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघ बांगलादेशचा व्हाईटवॉश करण्यासाठी प्रयत्न करेल. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 161 ( वेअरहॅम 57, हॅरिस 47, पेरी 29, मॅकग्रा 19, तृष्णा 4-19, नाहिदा अख्तर 2-21, फहिमा खातून 2-34), बांगलादेश 20 षटकात 9 बाद 103 (दिलारा अख्तर 27, फहिमा खातून 15, एस. अख्तर 21, रबिया खान 14, गार्डनर 3-17, मॉलिन्यू 3-10, स्कूट 2-31, वेअरहॅम 1-24).