शिवाजी विद्यापीठाच्या सवलतींचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

शिवाजी विद्यापीठाच्या सवलतींचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

शिवस्मारक येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. कविता वड्राळे यांचे मार्गदर्शन
खानापूर : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक सवलतींचा सीमाभागातील 865 गावातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्राध्यापक कविता वड्राळे यांनी खानापूर येथील शिवस्मारकात आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, डॉ. जगन करांडे, डॉ. संतोष सुतार, डॉ. नवनाथ वाळेकर हे उपस्थित होते. प्रारंभी आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात सीमाभागातील 865 गावातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शैक्षणिक सोय करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापिठाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
प्रा. कविता वड्राळे पुढे म्हणाल्या, 2023 पासून शिवाजी विद्यापीठातर्फे ही सवलतीची शैक्षणिक योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 44 तर दुसऱ्या वर्षी 87 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण सीमाभागात मार्गदर्शन शिबिर घेत आहोत. या योजनेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची राहण्याची मोफत सोय करण्यात आली असून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमात 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी भरमसाठ फी आकारण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. यासाठी शिवाजी विद्यापीठात सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शैक्षणिक सोय करण्यात आली आहे. विविध विभागात सवलती देण्यात आलेल्या आहेत. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाची माहिती घेऊन अर्ज करावेत, तसेच या योजनेतील अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधून आपले अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थी, पालक, समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.