लेंडी नाल्याच्या सफाईला सुरुवात

लेंडी नाल्याच्या सफाईला सुरुवात

बळ्ळारी नाल्यापर्यंत नाला साफ करण्याची मागणी
बेळगाव : लेंडी नाल्याच्या सफाईला महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. शास्त्राrनगरपासून जुन्या एसपीएम रोडपर्यंत सफाई करण्यात आली असून बळ्ळारी नाल्यापर्यंत या लेंडी नाल्याची सफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून व बेळगावच्या जनतेतून होत आहे. लेंडी नाल्यातून पाण्याचा निचरा झाला तरच शहराला पूराचा फटका बसणार नाही. त्यासाठी या नाल्याची सफाई करावी, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत या नाल्याची सध्या सफाई सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांनी नुकतीच बेळगाव परिसरातील विविध नाल्यांची सफाई करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार या नाल्यांच्या सफाईला सुरूवात झाली आहे.
जुन्या एसपीएम रोडपासून पुढे जाणारा लेंडी नाला शिवारातून जातो. त्या ठिकाणी हा नाला अरुंद झाला आहे. याचबरोबर हा नाला फुटून शिवारात पाणी जात आहे. त्याची दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र त्याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तेंव्हा बळ्ळारी नाल्यापर्यंत पूर्णपणे या लेंडी नाल्याची सफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. शहरातील गटारींचे पाणी या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात जाते. पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी या नाल्यातूनच वाहते. कचराही या नाल्यातून पुढे सरत असतो. तो कचरा शिवारामध्ये जावून अडकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लेंडी नाला हा शहरातील घाणपाणी वाहून नेणारा मुख्य नाला आहे. तेंव्हा हा नाला स्वच्छता करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तेंव्हा याकडे महानगरपालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.