उन्हाळी रताळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

उन्हाळी रताळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

रताळी पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर : खर्च कमी उत्पन्न अधिक देणारे पीक : योग्य हमी भाव मिळणे आवश्यक
वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्मयातील लाल मातीतील रताळी खाण्यासाठी स्वादिष्ट व ऊचकर असतात. त्यामुळे इथल्या रताळी पिकाला बाजारात चांगली मागणी असते. पूर्वी रताळी पीक फक्त खरीप हंगामात घेण्यात येत होते. अलीकडे मात्र उन्हाळी रताळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी खरीप हंगामात रताळी लागवड करणे. याच रताळी पिकांची नवरात्रोत्सवापासून काढणी सुरू होते. ती महाशिवरात्रीपर्यंत सुरू असते असे समीकरण गेल्या बऱ्याच वर्षापासून बेळगाव तालुक्मयात होते. सध्या मात्र बारा महिने रताळी पीक घेण्यात येऊ लागले आहे. उन्हाळी रताळी लागवडीसाठी शेतकरी शिवारातील विहिरी व कूपनलिकेच्या पाण्याचा वापर करत आहेत.
उन्हाळ्यातही रताळी वेल बहरलेलीच
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळवट्टी, राकसकोप, बेळगुंदी परिसरातील शेतकरी उन्हाळी रताळी लागवड अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही तशा प्रकारेच शिवारामध्ये बांधावर रताळी वेल बहरलेली पहावयास मिळत आहेत. रताळी हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे ठरणारे आहे. मात्र या पिकाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे. रताळी पिकांच्या बियांणासाठी खर्च कमी प्रमाणात येतो. कारण रताळी वेलीपासूनच लागवड केली जाते. त्यामुळे असलेल्या वेली जमा करून त्याची शेतकरी हव्या त्या हंगामात लागवड करत आहेत. बहुतांशी प्रमाणात खारीप हंगामातच रताळ्याची लागवड करण्यात येते. यामध्ये पश्चिम भागात सर्वाधिक रताळी लागवड केली जाते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शिवारात रताळी लागवडीसाठी बांध (मेरा) तयार करण्यात येतात. त्यावर दोन किंवा तीन आळीने रताळी वेल लागवड करतात.
बारा महिने रताळी उपलब्ध
उन्हाळी रताळी लागवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी स्पिंकलरच्या साहाय्याने रताळी वेलीला पाणी दिले आहे. तसेच खरीप हंगामातील रताळी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणासाठी म्हणून रताळी वेळ सध्या लागवड केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा मध्यंतरात आणि जुलै महिन्यात ही लागवड करण्यात येणार आहे. काही शेतकरी मात्र उन्हाळी रताळी लागवड करू लागले आहेत. त्यामुळे खाणाऱ्यांसाठी बारा महिने रताळी उपलब्ध होऊ लागली आहेत.
रताळी पिकांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प होणे गरजेचे
बेळगाव तालुका, खानापूर तालुक्मयाच्या काही परिसरात तसेच चंदगड भागात रताळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बेळगावच्या एपीएमसी मार्केट यार्डमधून दिल्ली, मुंबई, बेंगळूर, हरियाणा, अमेरिका आदी ठिकाणी निर्यात केली जाते. रताळी पिकाचा उपयोग फूड इंडस्ट्रिजमध्ये अधिक प्रमाणात करण्यात येतो. या परिसरातील उद्योजकांनी रताळी पिकांवर प्रक्रिया करणारा एखादा युनिट उभारणे गरजेचे आहे. जेणेकरून या भागातील रताळी पिकाची उचल चांगल्या पद्धतीने होईल आणि बेळगाव भागामध्ये रताळी पिकांवर प्रक्रिया करणारे युनिट तयार झाल्यास स्थानिक उद्योजकांनाही नवीन संधी उपलब्ध होईल.