हरियाणाच्या ‘जामताडा’मध्ये मोठी कारवाई

हरियाणाच्या ‘जामताडा’मध्ये मोठी कारवाई

30 सायबर गुन्हेगार जेरबंद : 50 मोबाइल, 90 बनावट सिम जप्त
वृत्तसंस्था/ नूंह
हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवरील कारवाई तीव्र केली होती. दुसरा जामताडा ठरलेल्या मेवातच्या 14 गावांमध्ये नूंह पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छापे टाकत सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली होते. आता पुन्हा एकदा पोलिसंनी सायबर गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. याकरता प्रतिबिंब हा अॅप पोलिसांसाठी सहाय्यभूत ठरला आहे. पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष मोहिमेत अनेक ठिकाणी छापे टाकत 30 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून 50 मोबाइल फोन आणि सुमारे 90 बनावट सिमकार्ड समवेत अन्य सामग्री हस्तगत केली आहे. सर्व सायबर गुन्हेगार बनावट दस्तऐवजांच्या आधारावर ऑनलाइन सामग्रीची खरेदी, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल, बनावट बँक खाते, ब्लॅकमेलिंग आणि पशू खरेदीची अॅड बनावट जाहिरात देत लोकांची आर्थिक फसवणूक करत होते.
देशाच्या विविध भागांमधील लोकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांची ओळख प्रतिबिंब या अॅपच्या माध्यमातून पटली होती. उच्च अधिकाऱ्यांच्या निर्देशावर सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी नूंह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. याकरता स्थापन विविध पथकांनी सक्रीय सायबर गुन्हेगारांच्या ठिकाणांवर छापे टाकत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सायबर पोलीस स्थानकाचे प्रभारी विमल राय यांनी दिली आहे.
अन्य राज्यांच्या पोलिसांना दिली माहिती
प्रतिबिंब अॅपच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटल्यावर पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावर आरोपींच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली होती. यानंतर एक विशेष मोहीम राबवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रतिबिंब अॅप विशेष स्वरुपात उपयुक्त ठरले आहे.  अॅप पोर्टलकडून मिळालेल्या माहितीनंतरच नूंहमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगारांविषयी अन्य राज्यांमधील फसवणुकीच्या प्रकरणांसंबंधी तेथील पोलिसांशी संपर्क साधत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.