एलियन्सच्या शोधासाठी ‘नासा’ बनवणार खास दुर्बीण
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्था आता राहण्यास योग्य अशा बाह्यग्रह तसेच परग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी एक खास दुर्बीण बनवणार आहे. या दुर्बिणीला ‘हॅबिटेबल वर्ल्डस् ऑब्झर्व्हेटरी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी ‘नासा’ने गरजेचे तंत्रज्ञान विकसित करण्यासही सुरुवात केली आहे. सुमारे 17.5 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीतून नेक्स्ट जनरेशन ऑप्टिक्स, मिशन डिझाईन आणि टेलिस्कोप सुविधांवर संशोधन करण्यासाठी तीन कंपन्यांना काँट्रॅक्ट देण्यात आले आहे. यावर याच वर्षी काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सध्याच्या बाह्यग्रह संशोधनावरून असे मानले जाते की, प्रत्येक पाचपैकी एका तार्याभोवती फिरणार्या ग्रहांमध्ये पृथ्वीसद़ृश्य ग्रह असण्याची शक्यता असते. ‘सायन्स अलर्ट’च्या रिपोर्टनुसार हॅबिटेबल वर्ल्ड ऑब्झर्व्हेटरी ही एक मोठी अंतराळ दुर्बीण असेल. तिचा उद्देश प्रामुख्याने आपल्या सूर्यासारख्या तार्याभोवती फिरणार्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेणे हा आहे.
बाह्यग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी रासायनिक संकेतांचा छडा लावला जाईल व त्यासाठी अशा ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास केला जाईल. ही मोहीम आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या मोहिमेत एखाद्या बाह्यग्रहावर ऑक्सिजन, मिथेनचा शोध घेतला जाईल, जे जीवसृष्टीचे संकेत देतात. ‘नासा’ने दोन वर्षांच्या कालावधीसाठी तीन प्रस्तावांची निवड केली आहे, ज्यामध्ये एकूण 17.5 दशलक्ष डॉलर्स गुंतवले जातील. उन्हाळ्याच्या अखेरीस या योजनेवर काम सुरू होईल.