ग्रीनलँडच्या बर्फात सापडला मोठ्या आकाराचा विषाणू

ग्रीनलँडच्या बर्फात सापडला मोठ्या आकाराचा विषाणू

लंडन : ग्रीनलँडच्या बर्फामध्ये अनेक धोकादायक विषाणू लपलेले आहेत. त्यापैकी एका मोठ्या आकाराच्या विषाणूला आता शोधण्यात आले आहे. बर्फ वितळल्यावर समोर आलेल्या शैवालाचे निरीक्षण करीत असताना संशोधकांना हा विशाल विषाणू दिसून आला. कोणत्या कारणामुळे विषाणू आपल्या सामान्य आकारापेक्षा इतका मोठा कसा होतो, हे यानिमित्ताने पाहिले जाईल.
संशोधक लॉरा पेरिनी यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये सामान्य विषाणूच्या तुलनेत अतिशय मोठा जीनोम अनुक्रम असतो. असा विषाणू सर्वप्रथम 1981 मध्ये समुद्रात सापडला होता. सर्वसाधारणपणे समुद्रात शैवाल विषाणूमुळे संक्रमित होत असतात. मात्र आता प्रथमच अशा बर्फाळ ठिकाणी असलेल्या शैवालामध्ये हा विषाणू आढळला आहे. असे विशाल व्हायरस कशा प्रकारे एखाद्या गुप्त शस्त्रासारखे काम करू शकतात आणि तसेच बर्फ वितळण्याचा वेगही कमी करू शकतात, हे यानिमित्ताने पाहिले जात आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘मायक्रोबायोम’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे सध्या अनेक ठिकाणचे पर्माफ्रॉस्ट वितळत असून, हजारो वर्षांपासून त्यामध्ये सुप्तावस्थेत राहिलेले विषाणू समोर येत आहेत. सैबेरियासारख्या ठिकाणी असलेल्या पर्माफ्रॉस्टमधून 40 हजार वर्षांपूर्वीचेही विषाणू दिसून आले आहेत. ‘पर्माफ्रॉस्ट’ म्हणजे बर्फ, माती व खडक यांची दीर्घकाळापासून गोठलेली जमीन. अशा ठिकाणी हजारो वर्षेही एखादा विषाणू सुप्तावस्थेत निष्क्रिय राहू शकतो व अनुकूल वातावरण मिळाल्यावर पुन्हा सक्रिय होऊ शकतो.