शिक्षक निवडणुकीत दोन अर्ज बाद; ३६ उमेदवार रिंगणात

शिक्षक निवडणुकीत दोन अर्ज बाद; ३६ उमेदवार रिंगणात

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये दोघांचे अर्ज बाद झाले असून, निवडणुकीमध्ये ३६ उमेदवार रिंगणात आहेत. आता बुधवारी (दि. १२) होणाऱ्या माघारीकडे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळत अंतिम यादी जाहीर केली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर सर्व लक्ष माघारीकडे लागले आहे. तत्पूर्वी सोमवारी (दि.१०) नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. एकूण ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय ३० वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले. निवडणुकीतील उमेदवार रणजित बोठे यांच्या प्रतिनिधींनी किशोर दराडे यांनी गुन्ह्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याचा आक्षेप घेण्यात आला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आल्याने नामनिर्देशन वैध ठरविण्यात आले.
माघारीसाठी घडणार नाट्य?
विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवार किशोर दराडे या उमेदवाराच्या बाबतीत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसल्याने सस्पेन्स कायम आहे. माघारीसाठी वेळ सुरू झाला असून, बुधवारपर्यंत माघारी घेण्यासाठी चांगलेच नाट्य घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:

Stock Market Opening Bell : शेअर बाजाराची ‘सावध’ चाल, सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले
Nashik | निवडणुकीची लगबग संपली ७८ पोलिसांना पदोन्नती मिळाली