वर्धा : ५२१ ग्रामपंचायतींत १५ लाखांचे डिजिटल पेमेंट

वर्धा : ५२१ ग्रामपंचायतींत १५ लाखांचे डिजिटल पेमेंट

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्या डिजिटल पेमेंटला मोठ्या संख्येत प्राधान्य दिले जात आहे. त्यात ग्रामपंचायतींनाही पेमेंटसंदर्भात ऑनलाईन सुविधा करण्यात आली आहे. सुविधा उपलब्ध झाल्यापासून जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींमध्ये १५ लाख रुपयांचे डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या करांचा भरणा रहिवाशांकडून करण्यात येतो. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर यासह इतरही विविध कर नागरिक ग्रामपंचायतीकडे जमा करतात. यापूर्वी ग्रामपंचायतींमध्ये रोख रकमेनेच कराचा भरणा केला जायचा. आता ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला क्यू आर कोड उपलब्ध करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करणार्‍यांचीही संख्या वाढलेली आहे. आजवर अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल १५ लाख १८ हजार ७६४ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट जमा करण्यात आले आहे.
ऑनलाईन पेमेंटच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे पेमेंट करणे सहज उपलब्ध झाले आहे. अनेक जण या सुविधेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील ५२१ ग्रामंपचायतींमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध झालेली आहे. यामुळे कागदांची बचत होण्यास मदत होणार आहे.
वर्धा तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये ५ लाख ८३ हजार २४८ रुपये, हिंगणघाट ७६ ग्रामंपचायतींमध्ये १ लाख तीन हजार ४९२ रुपये, कारंजा (घाडगे) ५९ ग्रामपंचायतींत ४ लाख ८८ हजार २६५ रुपये, आर्वी ७३ ग्रामपंचायतींत एक लाख ९९ हजार १७४ रुपये, समुद्रपूर ७१ ग्रामंपचायतींत एक लाख १८ हजार ९१२ रुपये, आष्टी ४१ ग्रामपंचायतींमध्ये ८ हजार ५८० रुपये, सेलू ६२ ग्रामपंचायतींत १२ हजार ५१३ रुपये आणि देवळी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार ५८० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यात आले आहे.