पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेतन किती? जागतिक नेते किती कमावतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेतन किती? जागतिक नेते किती कमावतात?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : PM Modi Salary : भारतात सार्वत्रिक निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. एनडीएने 293 जागा जिंकत सलग तिस-यांदा बहुमत मिळवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा रविवारी (दि. 9) पार पडला. एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान, पीएम मोदींना मिळणा-या वेतन आणि भत्ते याची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधानांचा पगार किती? (PM Modi Salary)
पंतप्रधान हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. हे पद भूषवत असताना नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या कामकाजाची जबाबदारी आहे. या कामासाठी त्यांना दरमहा 1.66 लाख रुपये वेतन मिळते. ज्याची वर्षाची एकूण रक्कम अंदाजे 20 लाख रुपयांपर्यंत जाते. या रकमेत मूळ वेतन 50,000 रुपये, खर्च भत्ता 3,000 रुपये, संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि दैनिक भत्ता 2,000 रुपये यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मोदींनी त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले तेव्हा त्यांनी बाँड, डिबेंचर, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये कोणतीही गुंतवणूक न करता त्यांची वैयक्तिक मालमत्ता 3.02 कोटी रुपयांची असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचे उत्पन्न वेतन आणि व्याज या दोन स्त्रोतांमधून आल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
पंतप्रधानांच्या तुलनेत, देशाच्या राष्ट्रपतींना महिन्याला 5 लाख रुपये वेतन दिले जाते. जे 2018 मध्ये 1.5 लाख रुपये होते. भारताचे उपराष्ट्रपती देखील 1.25 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये महिना कमावतात.
दुसरीकडे, एनडीटीव्हीच्या अहवालानुसार खासदारांना मूळ वेतन 1 लाख रुपये मिळते. 2018 मध्ये खासदारांना वेतनवाढ देण्यात आली होती.
पंतप्रधानांना कोणते फायदे मिळतात?
वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना अनेक भत्तेही मिळतील. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे त्यांना 7 लोककल्याण मार्गावर दिलेले अधिकृत घर. याला गृहनिर्माण खर्च किंवा भाडे आकारले जात नाही. याशिवाय त्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा, अधिकृत भेटींसाठी एअर इंडिया या विमानाचा वापर, बुलेट आणि स्फोटके विरोधी अलिशान गाड्यातून प्रवास मोफत असतो. निवृत्तीनंतरही, पंतप्रधानांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि अगदी SPG सुरक्षा प्रदान केली जाते.
पंतप्रधानांच्या पगाराची जागतिक नेत्यांशी तुलना कशी होते?
भारताचे पंतप्रधान इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत किती कमावतात हे पाहणे मनोरंजक आहे. अहवालानुसार, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक वेतन घेतात. त्यांना वर्षाला तब्बल 2.2 दशलक्ष डॉलर्स (18.37 कोटी रुपये) मिळतात. हाँगकाँगचे जॉन ली का-चिऊ सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या जागतिक नेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ते वर्षाला अंदाजे 6 लाख 72 हजार डॉलर्स (5.61 कोटी रुपये) कमावतात.
स्वित्झर्लंडच्या पंतप्रधानांना वर्षाला 4 लाख 95 हजार डॉलर्स (4.13 कोटी रुपये) वेतन मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना वर्षाकाठी 4 लाख डॉलर्स (3.34 कोटी रुपये) इतके वेतन मिळते पण त्यांना 50 हजार डॉलर्स इतका वेगळा भत्ता देण्यात येतो. याशिवाय, त्यांना व्हाईट हाऊस आणि एअर फोर्स वन सारख्या अत्यंत आलिशान सुविधा देण्यात येतात. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना प्रति वर्ष सुमारे 5 लाख 50 हजार डॉलर्सचे पॅकेज घेतात.
दरम्यान, ऋषी सुनक ज्यांची वैयक्तिक संपत्ती त्यांना युनायटेड किंगडमचे सर्वात श्रीमंत पंतप्रधान बनवते, त्यांना वर्षाला 2 लाख 12 हजार (1.77 कोटी रुपये) वेतन आहे. तसेच लंडनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांचे निवास्थान आणि बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील ग्रामीण भागातील निवासस्थान वापरण्याचाही त्यांना हक्क आहे. चीनचे पंतप्रधान म्हणून शी जिनपिंग किती कमावतात हे निश्चितपणे माहित नाही. परंतु 2015 मध्ये त्यांनी स्वतःला आणि उच्च अधिकाऱ्यांना 62 टक्के वेतनवाढ दिल्याची बातमी आली होती.