नाशिक : वेअर हाउसच्या चहुबाजूस कलम १४४ लागू

नाशिक : वेअर हाउसच्या चहुबाजूस कलम १४४ लागू

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीकरिता अंबड वेअर हाउस येथे स्ट्राँगरूम उभारण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ४) मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी वेअर हाउसच्या चहुबाजूंना १०० मीटर अंतरापर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच परिसरात पोलिस बंदोबस्त नेमून वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
देशभरात दि. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. मंगळवारी (दि. ४) सकाळपासून देशभरात मतमोजणी होणार आहे. त्यानुसार अंबड वेअर हाउस येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होईल. त्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिसरात कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे, तर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी परिसरातील वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना काढली आहे. तर परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. सहायक पोलिस आयुक्त देशमुख यांनी वेअर हाउसलगत १०० मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासह कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये. म्हणून हे आदेश जारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मतमोजणी केंद्रालगत व सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना माहिती द्यावी, त्याबाबत नोंदी घ्याव्यात, अशा सूचना आयुक्तालयाने पथकास दिल्या आहेत, तर मतमोजणी प्रक्रियेत कर्तव्यावर असणारे अधिकारी-कर्मचारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ओळखपत्र देत प्राधिकृत केलेले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार यांच्यासाठी नियमांत संयुक्तिक शिथिलता ठेवली आहे.
या गोष्टींसाठी राहणार मनाई
वेअर हाउसच्या चहुबाजूंकडील 100 मीटर अंतरापर्यंत सामान्य व्यक्ती, वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. या परिसरात वावरताना सेल्युलर फोन, मोबाइल, आयपॅड, स्मार्ट वॉच नेण्यास बंदी आहे. वायरलेस सेट, ज्वलनशील पदार्थ, अग्निशस्त्रे, घातकशस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.

अंबड एमआयडीसी चौकी हद्दीत वेअर हाउसमध्ये व परिसरात चोख बंदोबस्त नेमला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अन्वये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त

हेही वाचा:

Lok Sabha Exit Poll 2024 | मतमोजणीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
Lok Sabha Exit Poll 2024 | उत्कंठा मतमोजणीची : प्रशासन सज्ज; उद्या दुपारी तीनपर्यंत पहिला निकाल हाती येणार