टपालपेट्यांनाच पाहावी लागतेय पत्राची वाट
ओतूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पूर्वी गावागावांत महत्त्वाच्या ठिकाणी लालबुंद रंगाच्या व तिजोरी इतक्याच भक्कम आणि विशिष्ट आकाराच्या एकसारख्या टपालपेट्या जागोजागी प्रत्येकाला दिसतील अशा लटकवलेल्या असत. मात्र, काळाच्या ओघात त्या आता गावात कुठेही दिसून येत नाहीत. केवळ एखादी पेटी ही टपाल कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला दिसते. गावचा मुख्य चौक, ग्रामदैवत मंदिराबाहेर, एसटी बसस्थानकाच्या खांबाला, याप्रमाणे टपालपेट्या लावलेल्या असत. सद्य:स्थितीत मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात
या पेट्यांनाच पत्राची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे टपालपेट्या नामशेष झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पेटीवर रविवारी व सुट्टी सोडून दररोज असा मजकूर नमूद केलेला असे. या पत्राच्या पेट्यांनी त्या वेळी उन्हा-पावसात दिलेली सेवा अन् पेट्यांसोबत जोडले गेलेले प्रत्येकाचे भावनिक नाते, याचे आजच्या आधुनिक युगात कुतूहल वाटते. त्या वेळचे टपाल खात्यातील वातावरण, पोस्टमनची ती लगबग… हे सगळे टपालपेटी पाहूनच आठवते. टपाल कार्यालयातील अंधारलेले वातावरण आणि तिथे काम करणार्या कर्मचार्यांचे त्रासिक चेहरे आजही आठवतात.
पोस्टमन म्हटले की खाकी रंगाचा ढगाळ पोशाख, कानाला पेन्सिल अडकवलेला नेहमी कामात व्यस्त असलेला माणूस, ऊन-वारा-पावसात प्रामाणिकपणे पत्रे, मनिऑर्डर घरोघर वाटणारा, त्या वेळी प्रत्येकाला हा आपल्या कुटुंबातील घटक वाटायचा. प्रत्येकाच्या घरी पूर्वी आलेले टपाल अडकवण्यासाठी एक तार असायची, ती खुंटीला टांगून ठेवलेली असायची. या तारेला लावलेली पत्रेसुध्दा साचेबद्ध असायची. बहुतेकवेळा खुशालीचे पत्र… कोणी दगावले असेल तर ते पत्र… कुणाला नोकरीचे तर कुणाला मूल झाले म्हणून पत्र… बर्याचदा न्यायालयाच्या खटल्याबाबतची पत्रे किंवा मनिऑर्डरच्या चिठ्ठ्या हे सगळे त्या तारेला लावून ठेवले जायचे. हीच पत्रे आता चाळताना साचेबद्ध लिखाणपद्धतीत कसे बदल होत गेले, हे पाहायला मिळायचे.
शाळेत असताना पत्रलेखन हा विषय होता. पत्र लिहिण्याची पद्धत, लेखनाची मृदू भाषा, मुद्देसूदपणा, आदरयुक्त संबोधने हे सगळे शिकायला मिळायचे. पूर्वी मॅट्रिकचे किंवा अन्य परीक्षांचे निकाल देखील टपाल विभागाकडून पाठवले जायचे. त्या काळात एरवी पोस्टमन मित्र वाटत असला तरी निकालाच्या वेळी त्याची वेगळीच दहशत देखील वाटायची. टपाल कार्यालयातील वातावरण, मोडके फर्निचर, एका बाजूला आलेल्या टपालावर जोरजोरात शिक्के ठोकणारा पोस्टमन, विचारलेल्या प्रश्नांची लोकांवर खेकसून उत्तरे देणारा पोस्टमास्तर, पत्रे चिकटण्यासाठी लागणारी खळ, कधीही आढळून येणार नाही अशी खळीची ती बाटली.
साधारण 20 तो 25 वर्षांपूर्वीचे हे वातावरण आता मात्र पार बदलून गेलू आहे. आता टपाल कार्यालये सुसज्ज झालीत. तिथे मोठे काउंटर असते. लख्ख वीज, पंखे किंवा एसी आहेत. पहिल्यापेक्षा माणसांची गर्दीही दिसून येते. महिला कर्मचारी पोस्टमास्तर म्हणून काम करताना दिसून येत आहेत. एकूणच टपाल कार्यालयांचे रुपडे छान आहे. मात्र, दिसून येत नाहीत त्या लालबुंद रंगाच्या टपालपेट्या अन् घरात पत्र अडकवायची ती तार!
Latest Marathi News टपालपेट्यांनाच पाहावी लागतेय पत्राची वाट Brought to You By : Bharat Live News Media.