कोल्हापूर जिल्ह्यात ‘महाविकास’ की ‘महायुती’? उद्या फैसला

कोल्हापूर जिल्ह्यात ‘महाविकास’ की ‘महायुती’? उद्या फैसला

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ‘महाविकास आघाडी’ की ‘महायुती’ याचा फैसला मंगळवारी (दि. 4) होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मतदारांसह कार्यकर्ते आणि नेत्यांचीही दोन्ही मतदारसंघांच्या निकालाबाबत उत्सुकता आणि धाकधूकही वाढली आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांची लोकसभा निवडणूक चुरशीने झाली. कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत तिरंगी लढत झाली. आरोप-प्रत्यारोपांबरोबर महाविकास आघाडी आणि महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय पातळीवरील नेते, माजी मुख्यमंत्री, मंत्री, चित्रपट अभिनेते आदींनी प्रचाराचा धुरळा उडवला. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतानाच प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीकाही करण्यात आली. त्यातून टोकाला गेलेली ईर्ष्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या चुरशीने मतदारांनीही दोन्ही मतदारसंघांत भरभरून मतदान केले.
मतदारांनी कोणाला कौल दिला, हे आता काही तासांत कळणार आहे. मतमोजणी अवघ्या एक दिवसावर आल्याने मतदानानंतर सुरू असलेले तर्कवितर्क, विविध चर्चा आणि पैजा वाढू लागल्या आहेत. विविध हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये जेवणावळीचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून जल्लोषाचीही तयारी अनेकांनी सुरू केली आहे. एक्झिट पोलमुळे जय-पराजयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विविध गणिते मांडत, आपल्याच विजयाची खात्री समर्थक, कार्यकर्ते देऊ लागले आहेत. मंगळवारकडेही त्यांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनंतर सट्टा बाजाराच्या उलाढालीही वाढल्या आहेत. रविवारी दिवसभर सट्टा बाजारात चढ-उताराचे वातावरण होते. सोमवारी सट्टा बाजार तेजीत राहील, अशी शक्यता आहे.
मिरवणुकीवर बंदी, तरीही जल्लोषाची तयारी
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास प्रशासनाने बंदी घातली असली, तरी विजयाच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्याच उमेदवाराचा विजय होणार याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून उमेदवारांच्या समर्थकांनी ही तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत यंदा कमालीची चुरस आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि अपक्ष उमेदवार यामध्ये चुरस टोकाला गेली होती. नेत्यांनी प्रचारात घेतलेली भूमिका शेवटपर्यंत कायम राहिली का, हे निकालात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हे कल लक्षात घेऊनच उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोषाची पुरती तयारी केली आहे. ठिकठिकाणी लावण्यासाठीच्या होर्डिंग्जचे विविध आकारातील आणि मजकुरातील पॅटर्न तयार आहेत. या पोस्टरवर विजयी उमेदवारांच्या वेगवेगळ्या पोझमधील फोटो झळकणार आहेत. हे सर्व नमुने तयार असून, निकालाचा कल स्पष्ट होताच धडाधड प्रिंटिंग सुरू होणार आहे. उमेदवारांच्या विजयानंतर निवडणुकांना बंदी असली तरी मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवाराला निवासस्थानी घेऊन जातानाच मोठा जल्लोष केला जाणार आहे. यासाठी काही समर्थकांनी आतापासूनच आपल्या मोटारसायकलचे सायलेन्सर काढून ठेवले आहेत. त्याचप्रमाणे फुले आणि गुलालाची टनावारी उधळण करण्यासाठी जेसीबीचे बुकिंग करण्यात आले आहे. बहुतेक नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे जेसीबी या कामात जुंपण्यात आले आहेत. फटाक्यांचे बुकिंगही करण्यात आले आहे.
एका बाजूला मिरवणुकांवर बंदी, तर दुसर्‍या बाजूला प्रचंड जल्लोषाची तयारी असे चित्र सध्या आहे. निकालाचा कल स्पष्ट होईल तसा जल्लोष सुरू होईल.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक असा सरळ सामना आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत आहे. त्यामुळे चुरशीच्या सामन्यात विजय कोणाचा, यावर मोठ्या प्रमाणात पैजाही लागल्या आहेत.