नांदेड: कंधार येथे भक्ती मेडिकलला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान

नांदेड: कंधार येथे भक्ती मेडिकलला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान

कंधार, Bharat Live News Media वृत्तसेवा : कंधार येथील  भवानीनगर कमानी समोर असलेल्या भक्ती मेडिकल दुकानाला आज  (दि.२) सकाळी आठच्या  दरम्यान भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल पावणे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत मेडिकलमधील सुमारे ५० लाखांची औषधे आणि सामान जळून खाक झाले.
भवानी नगर कमानी समोर अमोल यदुराज गबाळे यांचे रिटेल तर आशिष संजय गबाळे यांचे होलसेल असे दोन्ही मेडीकल स्टोअर्स एकाच ठिकाणी दोन मजली इमारतीत आहेत. उजव्या बाजूला असलेल्या  ऐश्वर्या साडी सेंटरचेही आगीत नुकसान झाले आहे. सकाळी  इनव्हर्टरची बॅटरी किंवा फ्रिजच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली असावी, अशी माहिती अमोल गबाळे यांनी दिली.
घटनास्थळी भक्ती मेडिकलचे अमोल उबाळे आल्यानंतर पाण्याचे खासगी टॅंकरच्या सहाय्याने आग विझविली. एक तासानंतर आलेल्या नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने वरच्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू, आग आटोक्यात आली नाही. शेवटी लोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळविले.  आग विझविण्यात पोलिस दलानेही महत्वाची भूमिका बजावली.
 
कंधार नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणा कुचकामी
 
सकाळी ८ वाजता भक्ती मेडीकल स्टोअर्सला आग लागली.आग लागलेले ठिकाणापासून नगरपरिषद कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे.परंतू अग्निशामक दल वेळेत पोहचले नाही.जमावाने खासगी टॅंकरने आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतू आगीची तिव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात येवू शकली नाही.तब्बल एक तासानंतर कंधार न.प.चे अग्निशामक दल पोहचले.परंतू आगीची तिव्रता कमी करण्यात तत्परता दिसली नाही.आग विझविणाऱ्या पाईपमधुन अर्धे पाणी वाया जात असल्याने आग विझविण्यासाठी पाण्याचे आवश्यक प्रेशर नव्हते.पोलीस दलाने प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.परंतू आग पुर्णतः थांबू शकली नाही.शेवटी लोहा नपची अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले.तब्बल पावणे दोन तासानंतर आग आटोक्यात आली.