नागपूर: सोपान पांढरीपांडे यांना ६ वर्षांनी मिळाले गोमय धूपाचे पेटंट
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: नॅडेपकाका या नावाने विख्यात पुसदचे गांधीवादी अर्थतज्ज्ञ ना. दे. पांढरीपांडे यांनी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या नॅडेपकाका गो-दर्शन धूप या उत्पादनाला भारत सरकारने पेटंट देऊन सन्मानित केले आहे. हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा विषय असल्याची भावना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
नॅडेपकाकांचे ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ पत्रकार आणि या धूपाचे पेटंटधारक सोपान पांढरीपांडे यांनी संघ मुख्यालयात जाऊन हे धूप सरसंघचालकांना भेट दिले. ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे गोमयापासून निर्मित कोणत्याही धूपाला प्राप्त झालेले हे पहिलेच भारतीय पेटंट आहे, अशी माहिती सोपान पांढरीपांडे यांनी ‘Bharat Live News Media’शी बोलताना दिली.
“घराच्या खोलीत यज्ञकर्म सहजतेने करता येईल, असा हा धूप तयार करण्यासाठी स्वत: नॅडेपकाकांनीच संशोधन सुरू केले होते. त्यांचे अपूर्ण कार्य आम्ही (मी आणि माझा भाऊ अविनाश) पूर्ण केल्यावर 2018 मध्ये पेटंटसाठी अर्ज केला आणि 6 वर्षानंतर पेटंट मिळाले.
घरच्या घरी यज्ञकर्म, प्रदूषणमुक्ती आणि कीटकांना पिटाळून लावणे या तीनही मुद्यांवरचे आमचे संशोधनात्मक दावे पेटंट नियंत्रकांनी मान्य केले आहेत, याकडे त्यांनी सरसंघचालकांचे लक्ष वेधले. या धूपात गोमयासह पंचगव्य, हवन सामग्री, नवग्रह समिधा आदी ३५ वैदिक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या संशोधनाला चार वर्षांचा कालावधी लागला आणि पेटंट 20 वर्षांसाठी मिळाले आहे.
गेल्या पिढीतील गांधीवादी तत्त्वचिंतक नॅडेपकाका हे गायीच्या अर्थशास्त्राचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी तयार केलेले कम्पोस्ट खत आज नाबार्डच्या सहाय्याने देशभर उत्पादित केले जाते. देवलापारच्या गोविज्ञान संस्थेच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. रा. स्व. संघाने १९९७ साली त्यांना गायीच्या अर्थशास्त्राबद्दल मा. स. गोळवलकर पुरस्कारही दिला होता.
हेही वाचा
नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अॅड. नंदा पराते
नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
नागपूर महापालिकेने ६०० कोटींची जमीन १ रुपया लीजवर देण्याचा निर्णय मागे घ्यावा : ठाकरे