कोल्हापूर: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून 

कोल्हापूर: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून 

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईमधील १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेला व सध्‍या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्‍या कैद्याचा निर्घृण खून करण्यात आला. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे मृत कैद्याचे नाव आहे. रविवारी (दि.२) सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मारहाण केली. त्‍यातच मुन्‍ना याचा मृत्यू  झाला.
खूनाच्या या  प्रकारामुळे कळंबा जेलमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गांजा सापडणे, पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेल पुरते बदनाम झाले आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने कळंबा जेलच्या झाडाझडतीत ८० हून अधिक मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.
कळंबा जेलमध्ये कैद्यांकडे मोबाइल, गांजा पुरवठा, कारागृहात कैद्यांची हाणामारी, अशा सातत्याने घटना उघडकीस आल्या आहेत. सलग झालेल्या घटनांमुळे गंभीर दखल घेत श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.