दहावीचा निकाल 92.38 टक्के

दहावीचा निकाल 92.38 टक्के

यंदाही मुलींची चमक : 18914 पैकी 17473 उत्तीर्ण : 9318 मुलांपैकी 8555 तर 9596 मुलींपैकी 8918 उत्तीर्ण
पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात 92.38 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा चमक दाखवली असून त्यांची टक्केवारी 92.93 एवढी आहे, तर मुलांची टक्केवारी 91.80 एवढी आहे. एकूण 18914 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 17473 जण पास झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी दिली. पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेटये यांनी निकाल जाहीर केला. यंदा 9318 मुलांनी परीक्षा दिली होती. त्यातील 8555 जण तर 9596 मुलींपैकी 8918 मुली पास झाल्या आहेत. राज्यातील एकूण 408 माध्यमिक शाळांतून या परीक्षेसाठी 19557 मुलांची नोंदणी केली होती. या शाळांमध्ये 319 अनुदानित, 11 विनाअनुदानित तर 78 सरकारी शाळा यांचा समावेश आहे. एकूण 464 दिव्यांग मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 407 मुले उत्तीर्ण होऊन ती टक्केवारी 87.72 एवढी आहे. दोन विषयांत नापास झालेलयांना एटीकेटी सवलत देण्यात आली असून त्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी त्यांनी पुरवणी परीक्षेत नापास झालेले विषय सोडवावेत किंवा त्यांना अकरावी निकालापूर्वी ते विषय पास होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण वर्ग 687, ओबीसी 101, एससी 21, एसटी 60 मिळून 869 जणांना एटीकेटीची सवलत मिळाली आहे. विविध कारणांमुळे 38 मुले अािण 59 मुलींचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. काही शाळांनी मुला-मुलींचे शाळेतील गुण पाठवले नाहीत. त्यामुळे त्यांचा निकाल राखीव ठेवणे भाग पडले असून अशा शाळांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा विचार असल्याचे शेटये यांनी सांगितले. यंदा एकूण 6727 जणांना क्रीडागुण बहाल करण्यात आले. परंतु केवळ 263 जण त्या गुणांमुळे पास झाले इतरांना क्रीडागुणांचा लाभ होऊनही ते पास होऊ शकले नाहीत, अशी माहिती शेटये यांनी दिली.
धारबांदोडा तालुका 87.35 टक्के यापैकी तीन शाळांचा निकाल 100 टक्के लागला. पेडणे तालुका 94.25 टक्के, यापैकी 15 शाळा शंभर टक्के, सत्तरी 91.09 टक्के. पैकी 8 शाळा शंभर टक्के. फोंडा 94.31 टक्के. पैकी 13 शाळा 100 टक्के. सासष्टी 93.82 टक्के. पैकी 18 शाळा शंभर टक्के. डिचोली 93.08 टक्के. पैकी 10 शाळा 100 टक्के, तिसवाडी 91.58 टक्के. पैकी 12 शाळा शंभर टक्के. केपे 90.09 टक्के.  पैकी 9 शाळा शंभर टक्के. बार्देश 91.15 टक्के. पैकी 16 शाळा शंभर टक्के. मुरगाव 90.86 टक्के पैकी 5 शाळा शंभर टक्के. सांगे 89.60 टक्के पैकी 5 शाळा शंभर टक्के. काणकोण 95.02 टक्के पैकी 10 शाळा 100 टक्के एवढा निकाल लागला. एकूण 3809 जणांनी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर 6317 जणांनी 60 ते 75 टक्केवारीत स्थान प्राप्त केले आहे. आणि 5348 जणांनी 45 ते 60 टक्केवारीत गुण घेतले आहेत. मागील वर्षी 2023 मध्ये दहावीचा निकाल 97.64 टक्के लागला होता. त्याच्या तुलनेत यंदाचा निकाल 5 टक्के कमी होऊन 92.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यासाठी अनेक कारणे असल्याचे शेटये यांनी नमूद केले. परंतु, नेमकी कारणे सांगण्यास त्यांनी नकार दर्शविला. गोवा बोर्डाने 1 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत राज्यातील 31 केंद्रांमधून दहावीची परीक्षा घेतली होती. आता पुढील वर्षाची म्हणजे 2025ची दहावीची परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. अनेक शाळांमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत दहावीचे वर्ग घेऊन काही प्रमाणात त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येतो. बहुतेक शाळांमध्ये डिसेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होतो, असेही शेटये यांनी सांगितले. गुणांच्या उत्तर पत्रिकेची फेरतपासणी पुनर्मूल्यांकन यासाठी 27 मेपर्यंत गोवा बोर्डाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून दहावीची पुरवणी परीक्षा 10 जूनपासून सुरू होणार असल्याचे शेटये यांनी स्पष्ट केले.
तालुका  निकाल (टक्के)     शंभर टक्के निकाल

धारबांदोडा 87.35      3
पेडणे      94.25      15
सत्तरी     91.09       8
फोंडा     94.31       13
सासष्टी   93.82      18
डिचोली 93.08      10
तिसवाडी   91.58    12
केपे         90.09      9
बार्देश     91.15       16
मुरगाव   90.86        5
सांगे        95.02      10