लोकसभेच्या आखाड्यातच महापालिकेच्या गटपार्ट्या

लोकसभेच्या आखाड्यातच महापालिकेच्या गटपार्ट्या

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार ताकद आमजावत असतानाच कोल्हापुरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भागाभागात महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला. महापालिकेची निवडणूक कधी होईल, याची अनिश्चितता असली तरी आता मागे राहून चालणार नाही, याची जाणीव झालेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.
कोल्हापूर महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाल्यापासून पक्षांना महत्त्व आले आहे. नेत्यांच्या आघाडीचे राजकारण या पक्षीय राजकारणाने संपवले असून, आता नेत्यांनाही आपले राजकारण रेटायचे असेल तर पक्षाचाच आधार घ्यावा लागत आहे. 1991 पासून कोल्हापूर महापालिकेत महादेवराव महाडिक, अरुण नरके व पी. एन. पाटील या मनपा आघाडीची सत्ता सुरू झाली; मात्र सतेज पाटील, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी एकत्र येऊन मनपा युतीच्या सत्तेला ब—ेक लावला. जो पॅटर्न मनपा युतीने सत्ता राबविण्यासाठी वापरला, तोच सत्तेचा महाडिक पॅटर्न राबवत त्यांनी या सत्तेला आव्हान दिले. त्यानंतर महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले.
सन 2020 मध्ये महापालिकेची मुदत संपली तेव्हा महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी राज्यात कोठेही नसलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी महाविकास आघाडी कोल्हापूर महापालिकेत सत्तेवर आली व त्यांनी सत्ता टिकवली. या सत्तेला हादरे देण्याचा प्रयत्न झाला, तरी आघाडी अभेद्य राहिली. सन 2020 मध्ये महापालिकेची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासकीय राजवट सुरू झाली. यापूर्वी तीन वेळा महापालिकेची निवडणूक होणार असे जाहीर झाले. प्रभाग रचना जाहीर झाली. आरक्षणही जाहीर झाले. आपले मतदारसंघ सुटल्याच्या आनंदात अनेकांनी मिरवणुकाही काढल्या; पण हे सगळे बासनात बांधले गेले. कधी एकसदस्यीय मतदारसंघ, तर कधी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार म्हणून जाहीर झाले. चार नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे.
त्यामुळे भागाभागातील स्पर्धा व संघर्षाचे वातावरण काहीसे कमी होत चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असल्यामुळे जवळच्या भागातील कार्यकर्ते एकत्र येत पक्षाचे काम करतानाचे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसले. विशेषत: जुन्या पेठांत हे चित्र जोरदारपणे समोर आले. खरे तर लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी होते. कोल्हापुरात मात्र महापालिका निवडणुका कधी व्हायच्या त्या होवोत; पण कार्यकर्ते तयार असल्याचे चित्र होते. पक्ष, चिन्ह व आरक्षण या कशाचाही विचार न करता बर्‍याच दिवसांनी लोेकसभेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे मोहोळ पेठांच्या कोपर्‍याकोपर्‍यावर अनुभवायला मिळाले, हे लोकसभा निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.
सतेज, पी.एन., मालोजीराजे विरुद्ध हसन मुश्रीफ, महाडिक आणि विनय कोरे
यापूर्वी आघाडी व पक्षीय राजकारणात महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके, तर काही काळ व्ही. बी. पाटील यांनी महापलिकेत सत्ता राबविली. नंतर व्ही. बी. पाटील बाहेर पडले. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांनी महाडिक पॅटर्न राबवूनच महापालिकेतील महाडिक गटाची सत्ता उलथवली. आता राजकीय चित्र वेगळे आहे. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातही राजकारणात बदल झाले आहेत. सतेज पाटील यांच्याबरोबर पूर्वीच्या राजकारणात एकत्र असणारे हसन मुश्रीफ व विनय कोरे हे महायुतीत गेले आहेत. त्यांनी ज्या महाडिक यांची सत्ता बदलली, तेच महाडिक आता महायुतीत आहेत, तर बदलत्या राजकारणात शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे सतेज पाटील, पी. एन. पाटील, मालोजीराजे, व्ही. बी. पाटील महापालिकेच्या राजकारणाच्या नव्या वळणावर एकत्र आले आहेत. याच वळणाने हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, संजय मंडलिक या परस्पर विरोधकांनाही एकत्र आणले आहे.